या चिमण्यांनो, परत फिरा ..घराकडे आपुल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:05 AM2021-03-20T04:05:22+5:302021-03-20T04:05:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘एक घास चिऊताईचा’ असे म्हणून आई आपल्या बाळाला एक-एक घास मायेने भरवते. एकेकाळी प्रत्येक ...

These sparrows, come back .. yours to the house! | या चिमण्यांनो, परत फिरा ..घराकडे आपुल्या!

या चिमण्यांनो, परत फिरा ..घराकडे आपुल्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘एक घास चिऊताईचा’ असे म्हणून आई आपल्या बाळाला एक-एक घास मायेने भरवते. एकेकाळी प्रत्येक घराचा अविभाज्य भाग असलेला एक पक्षी म्हणजे चिमणी! कुठेतरी प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींशी चिमणी जोडली गेलेली आहे. सध्यातरी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. यासाठी प्रत्येकाने चिमण्यांच्या संवर्धनासाठी योगदान देण्याची गरज आहे. अन्यथा बालपणी ऐकलेल्या गोष्टीप्रमाणे ‘एक होती चिऊताई’ असेच दुर्दैवाने म्हणण्याची वेळ भविष्यात येईल; आणि हाच ‘चिमणी दिना’चा खरा सांगावा आहे, असे म्हणावे वाटते.

अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका निरीक्षणानुसार, मातीचे कमी झालेले प्रमाण हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. ‘मडबाथ’ चिमण्यांना उपयुक्त असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरावरचे जीवजिवाणू जातात. अपचनासाठी मातीतील खडे त्यांना उपयुक्त असतात. पण, वाढत्या सिमेंट-काँक्रिटीकरणामुळे मातीच नष्ट झाली. तसेच मीलनकाळात चिमण्या मातीत लोळतात. पण, मातीच नसल्याने त्यांच्या मीलनात अडथळे येऊ लागले. या काँक्रिटच्या जंगलात चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास जवळ जवळ नष्ट झाला.

चिमण्यांच्या आवाजाने पूर्ण परिसर हसून उठत असतो. चिमण्यांच्या चिवचिवाटामुळे आपल्याला एक आल्हादायक वातावरणाचा अनुभव येत असतो. साधारण १४ ते १६ सेंटिमीटर असलेली नाजुकशी चिमणी आपल्याला नक्कीच आकर्षित करीत असते. पण, चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने जागतिक स्तरावरील पर्यावरण व पक्षिप्रेमी चिंतित आहेत. चिमण्यांची संख्या घटल्याने ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे..’ अशी साद घालायची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे.

का घटल्या चिमण्या?

विविध विकासकामांमुळे शहरात वृक्षांची होणारी कत्तल हे प्रमुख कारण आहे. देशी झाडे कमी होऊन विदेशी झाडांची संख्या वाढली आहे. विदेशी वृक्षांवर पक्षी आपले घरटे बांधत नाहीत. यामुळे चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. उंच इमारती आणि विजेच्या दिव्यांच्या उंच खांबांमुळे रात्रीसुद्धा असणारा प्रकाश पक्ष्यांच्या रात्री विश्रामात व्यत्यय निर्माण करीत आहे.

प्रतिक्रिया :

चिमण्यांसाठी पोषक वातावरण निर्माण केले, तर त्यांची घटलेली संख्या नक्की वाढेल. मानवी वस्तीमध्ये शक्य तेथे वृक्षारोपण, तसेच कृत्रिम घरटी आणि मातीच्या भांड्यात पाण्याची व्यवस्था, घराच्या अंगणात व गच्चीवर दररोज पसाभर धान्य पसरवून टाकणे, अशा उपाययोजना केल्या, तर चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा अनुभवायला मिळू शकेल.

- विजय अवसरे, निसर्ग अभ्यासक.

चिमण्यांनाही द्या जागा..!

– फ्लॅट, घराच्या टेरेसवर, खिडकीत चिमण्यांसाठी दाणा-पाणी ठेवा. चिमण्यांना पाण्यात खेळायला प्रचंड आवडते.

– शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांपासून त्यांना खाद्य भरवायचे फिडर बनवू शकतो. त्यांच्यासाठी घरात कृत्रिम घरटी बांधल्यामुळे त्यांच्या निवाऱ्याची सोय होईल.

– घराजवळच्या मोकळ्या भूखंडावर, कॉलनीतील रस्त्यांच्या कडेला लहान वेली आणि रोपांची लागवड करा. त्यांचे संवर्धन करा.

– चिमण्यांसाठी नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी बाभूळ वृक्षाची लागवड व संवर्धन करा. यावर चिमण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

Web Title: These sparrows, come back .. yours to the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.