मुंबईतल्या या काही गोष्टी ठरल्या भारतातील पहिल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 11:04 AM2017-12-08T11:04:42+5:302017-12-08T11:09:23+5:30
मुंबई ही स्वप्ननगरी आहे आणि मुंबईत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या संपुर्ण देशात पहिल्यांदा झाल्या होत्या.
मुंबई : सात बेटांवर वसलेलं मुंबई हे शहर आता जागतिक दर्जाचं शहर बनतंय. गेल्या काही दशकात या शहरात अनेक बदल झाले. शहराची जागा कमी असली तरीही या एवढ्याश्या जागेवर मुंबईने कित्येकांना आसरा दिला आहे. पण मुंबई काही वेगळ्या कारणांनीही ओळखली जाते. भारतातील अनेक गोष्टींची सुरुवात ही मुंबईपासूनच झाली आहे. त्यामुळे मुंबईकडे पहिल्या वहिल्या गोष्टींची सुरुवात करणारं शहर म्हणूनही ओळखलं जातं.
लोकल ट्रेन
भारतात सगळ्यात आधी लोकल ट्रेन मुंबईत सुरू झाली. १६ एप्रिल १८५३ साली पहिली ट्रेन मार्गस्थ झाली होती. बोरी बंदर (आताचे सीएसटीएम) ते ठाणे असा प्रवास या ट्रेनने केला होता. त्यानंतर देशभर ट्रेन सुरू करण्यात आल्या. ब्रिटिशांनी दिलेली ही सुविधा संपूर्ण आशिया खंडात मुंबईत सर्वप्रथम सुरू करण्यात आली होती. मुंबई ते ठाणे हा ३४ किमी अंतर यावेळी या रेल्वेने पार केले होते. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी ही पहिली रेल्वे तयार झाली होती. त्यानंतर लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन ठरली. आज जवळपास ७५ लाखांहून अधिक प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. तसं पाहायला गेलं तर मुंबईचा विस्तार फार लहान आहे. त्यामुळे उत्तरेकडे मुंबई पसरत गेली. आता मध्य मार्गावर कर्जत-कासारापर्यंत तर पश्चिम मार्गावर वसई-विरारपर्यंत मुंबईने हातपाय पसरले आहेत. दक्षिण मुंबईत अनेक कार्यालये आहेत. कासारा-विरारपर्यंत राहणारे चाकरमनी लोकल या वाहतूक व्यवस्थेचा वापर करत मुंबईत दाखल होत असतात. तसंच, मुंबईत इतर प्रांतातून अनेक लोक स्थायिक झाले, त्यामुळे मुंबईची लोकसंख्या वाढत गेली आणि त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला. म्हणूनच वाहतुकीचा कणा असलेल्या लोकलमध्ये ही गर्दी वाढत गेली.
पहिलं रेल्वे स्थानक
ज्याप्रमाणे बोरी बंदर ते ठाणे अशा स्थानकावर पहिली ट्रेन धावली त्याचप्रमाणे बोरी बंदर हे भारतातील पहिलं रेल्वे स्थानक आहे. १६ एप्रिल १९५३ सालीच या बोरी बंदर रेल्वे स्थानकाचं उद्घाटनही करण्यात आलं. त्यानंतर येथून पहिली ट्रेन मार्गस्थ झाली. हा परिसर बोरी बंदर या नावाने ओळखला जायचा त्यामुळे या स्थानाकाला बोरी बंदर असं नाव देण्यात आलं. त्यानंतर या स्थानकाचं चारवेळा नामांतर झालं आहे. १९९६ सालापासून या स्थानकाला छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणून ओळखलं जातंय. आता पुन्हा या स्थानकाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं झालंय.
पहिल फाईव्ह स्टार हॉटेल
मुंबईतलं ताज हॉटेल हे जगातील पहिलं फाईव्ह स्टार हॉटेल आहे. मुंबईतील वॅटसन हॉटेलमध्ये जमशेदजी टाटा यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्या इर्ष्येतूनच जमशेदजी यांनी ताज हॉटेलची निर्मिती केली. १९०३ साली बांधलेलं हे हॉटेल आजही तितक्याच दिमाखदार पद्धतीने गेट ऑफ इंडियाच्या समोर उभं आहे. संपूर्ण भारतात या हॉटेलने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या हॉटेलमध्ये एकदा तरी जाता यावं अशी प्रत्येक सामान्य मुंबईकरांची इच्छा आहे. तसंच, अनेक दिग्गज लोकांच्या विविध पार्टी इथं होत असतात. त्याचप्रमाणे या हॉटेलच्या इमारतीचं बांधकामही तेवढंच प्रसिद्ध आहे. एका इर्ष्येपोटी जन्माला आलेलं हे हॉटेल भारतातलं सगळ्यात पहिलं फाईव्ह स्टार हॉटेल आहे. त्याचप्रमाणे फाईव्ह स्टार हॉटेलने एवढी वर्ष त्यांचं सातत्यही कायम ठेवलं आहे.
जुहू एरोड्रोम
सांताक्रुझ विमानतळ सुरू होण्याआधी मुंबईत जुहूमध्ये विमानतळ होतं. १९२८ साली हे प्रवासी विमानतळ बांधण्यात आलं होतं. दुसऱ्या महायुद्धापर्यंत या विमानतळाचा वापर केला जात होता. दुसऱ्या महायुद्धानंतर मोठे विमानतळ बांधण्याचा घाट घालण्यात आला. जुहूचं विमानतळ हे समुद्रकिनाऱ्यापासून जवळ होतं. त्यामुळे पावसाळ्यात हवाई उड्डाण करताना अडथळा निर्माण होत असे. म्हणून मुंबईत इतर ठिकाणी विमानतळ बांधण्यात येणार होतं. म्हणून दुसरे विमानतळ सांताक्रुझ आणि विलेपार्ले या उपनगरांदरम्यान बांधण्यात आला. १९४८ या नव्या विमानतळाचं बांधकाम पूर्ण झालं. पण जुहू एरोड्रोम हे भारतातील पहिलं विमानतळ म्हणूनच ओळखलं जातं. आता हे विमानतळ छोटी खासगी वाहने आणि हेलिकॉप्टरसाठी वारण्यात येतं.