लॉकडाऊन संपेपर्यंत सेवा करण्याचा ध्यास ते देत आहेत, रोज २ हजार नागरीकांना घरपोच जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 03:22 PM2020-04-13T15:22:57+5:302020-04-13T15:24:44+5:30
दिव्यातील हातावरचे पोट असणाऱ्यांच्या मदतीला साबे गाव ग्रामस्थ मंडळ धावून आले आहे. मागील १३ दिवसापासून सलग येथील तब्बल २ हजार नागरीकांना घरपोच जेवण देण्याची मोहीम त्यांनी उघडली आहे. लॉकडाऊन वाढवला तरी आमची मोहीम सुरु राहणार असल्याचे ते सांगतात.
अजित मांडके
ठाणे : एकीकडे कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु याचा सामना करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, काही दानशुर मंडळी पुढे आल्या आहेत. दिवा सारख्या भागात काही गावकऱ्यांनी एकत्र येऊन साबे गाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने रोज २ हजार नागरीकांना घरपोच जेवण दिले जात आहे. जो पर्यंत लॉकडाऊन आहे, तो पर्यंत आमची ही मदत सुरुच राहणार असल्याचे येथील गावकरी सांगत आहेत. त्यानुसार आतापर्यंत तब्बल २६ हजार नागरीकांना या ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अनेक गोरगरीब आणि हातवरचे पोट असणाऱ्यांचे हाल सुरु झाले आहेत. रोज कमवायचे रोज खायचे असेही अनेक कुंटुब आहेत, ज्यांचे हाल सुरु आहे. परंतु अशांसाठी अनेक संस्था, दानशुर मंडळी पुढे आले आहेत. त्यानुसार आता लॉकडाऊन लागू झाल्यापासून सलग १३ दिवशीसुध्दा दिव्यातील साबे गावातील ग्रामस्थ निलेश पाटील आणि आदेश भगत यांच्या माध्यमातन येथील तब्बल २ हजार रहिवाशांना रोज जेवण तयार करुन देत आहेत. येथील मंदीर परिसरात दुपारी ३ वाजल्यापासून ग्रामस्थ एकत्र येऊन कधी खिचडी तर कधी डाळभात अशा स्वरुपाचे जेवण तयार केले जात आहे. यासाठी सोशल डिस्टेंट ठेवून जेवण तयार करण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. त्यातही जेवण तयार झाल्यानंतर ते घरपोच देण्याचे कार्यही याच मंडळींकडून सुरु आहे.
दरम्यान आता दिव्यातही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर या ग्रामस्थांनी घरपोच रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ही मंडळी त्यासाठी तयार झाली आहे. कोणीही उपाशी झोपू नये असा आमचा उद्देश आहे, तसेच किराणा सामान, भाजीपाला घेण्यासाठी घराबाहेर पडू नये म्हणून आम्ही ही सेवा सुरु केली आहे. जेणेकरुन नागरीक ांनी घराबाहेर न पडता घरात राहून सुरक्षित रहावे हाच आमचा मु उद्देश या मोहीमे मागचा असल्याची माहिती निलेश पाटील यांनी दिली. लॉकडाऊन वाढला असला तरी आमची ही सेवा आम्ही अशीच सुरु ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.