त्यांनी तलवारीने हल्ला केला, पोलीस पाहात राहिले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:06 AM2021-07-20T04:06:32+5:302021-07-20T04:06:32+5:30
बोरिवलीत वकिलावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: ' मी अशिलासोबत बोलत उभा होतो तेव्हा १५ जणांचे टोळके ...
बोरिवलीत वकिलावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: ' मी अशिलासोबत बोलत उभा होतो तेव्हा १५ जणांचे टोळके तेथे आले आणि मला मारहाण करू लागले. माझ्या सहकाऱ्यांवरही त्यांनी हल्ला चढवला. मात्र, हे सगळे घडत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली’, असा आरोप ॲड. सत्यदेव जोशी यांनी व्हिडिओमध्ये केला आहे. वकिलावर हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी वकिलवर्गाकडूनही निषेध व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत भररस्त्यात वकिलावर तलवारीने सपासप वार करून काही लोक पळ काढताना दिसत आहेत. दहिसरमधील एका प्लॉटच्या मालकी हक्कावरून हा वाद सुरू आहे. ज्यात ॲड. जोशी यांना लक्ष्य करण्यात आले. जोशी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, जमिनीच्या वादातून १८ जुलै, २०२१ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दहिसरच्या झेन गार्डनसमोर ते त्यांचे अशील आणि अन्य सहकाऱ्यांसह उभे होते. त्यावेळी अरुण उपाध्याय, मुकेश भाटिया, भालचंद्र पाटील, केशरी पाटील, अनंत पाटील यांनी संगनमत करत व्यंकटेश, उषा निकम, गणेश लाखे, मनोज शिंदे, अश्विन गोहिल आणि अन्य १० ते १५ इसमांना हल्ला करण्यास पाठविले होते. तलवार, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा प्रकार पाहून घटनास्थळी असलेले रिक्षाचालक, टॅक्सीचालक व अन्य लोकांनी घटनास्थळाहून पळ काढला, तर दुकानेही बंद करण्यात आली. हल्लेखोरांनी नागरिकांना धमकावत कोणी जवळ आले तर त्यांचेही असेच हाल केले जातील, असे धमकावले. जखमी करून हल्लेखोर पसार झाल्यावर पोलीस घटनास्थळी आले आणि जोशी यांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथून त्यांना बोरिवलीच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच फरारी आरोपींचा शोध सुरू आहे.