रक्तदान करायला 'ते' दोघे थेट व्हिएतनामला; २८ दिवसाच्या बाळाचा हा रक्तगट दुर्मीळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 07:53 AM2023-02-21T07:53:38+5:302023-02-21T07:53:51+5:30
२८ दिवसांच्या बाळाला दुर्धर आजार असल्याने त्याच्यासाठी रक्ताची जमवाजमव सुरू होती. या बाळाचा रक्तगट हा बॉम्बे असल्याने असा रक्तगट असणाऱ्या व्यक्ती फार कमी प्रमाणात भारतात आढळतात.
मुंबई - रक्तदान हेच श्रेष्ठदान असे आपण नेहमीच म्हणतो. त्याचा प्रत्यय नुकताच आला असून दोन मुंबईकर रक्तदान करण्यासाठी थेट व्हिएतनाम देशातील हनोई शहरात पोहोचले. त्या ठिकाणी २८ दिवसांच्या बाळाला बॉम्बे या दुर्मीळ रक्ताच्या गटाची गरज होती. मात्र तेथे या गटाचा रक्तदाता मिळत नसल्याने मुंबईतील या दोन नागरिकांनी तेथे जाऊन रक्तदान केले. ते व्हिएतनामवरून परत आले आहेत.
२८ दिवसांच्या बाळाला दुर्धर आजार असल्याने त्याच्यासाठी रक्ताची जमवाजमव सुरू होती. या बाळाचा रक्तगट हा बॉम्बे असल्याने असा रक्तगट असणाऱ्या व्यक्ती फार कमी प्रमाणात भारतात आढळतात. तेथील भारतीयांनी व भारतीय वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांनी मुंबईत थिंक फाउंडेशन या संस्थेला संपर्क केला. भारतात ही सामाजिक संस्था बॉम्बे रक्तगट असणाऱ्या व्यक्तीची नोंद ठेवते. याप्रकरणी थिंक फाउंडेशनचे विनय शेट्टी म्हणाले, १५ फेब्रुवारीला संध्याकाळी मला फोन आला, त्यामध्ये त्यांनी या दुर्मीळ रक्तगट असलेल्या रक्ताची गरज असल्याचे सांगितले. तर त्यांना रक्त मुंबईत दान करतो व पाठवतो, असे सांगितले. व्हिएतनाम देशाच्या कायद्यानुसार अशा पद्धतीने रक्त घेतले जात नाही. त्यासाठी दात्याला येथे यावे लागेल. असे सांगितले. त्याच्या दुसऱ्या दिवशी दात्यांच्या रक्ताच्या चाचण्या करून त्यांना ई-व्हिसाची आणि तिकिटाची व्यवस्था करण्यात आली. त्यानुसार प्रवीण शिंदे आणि आशिष नलावडे हे रक्तदाते तात्काळ व्हिएतनाम येथे पोहोचले, रक्तदान केले आणि भारतात परत आले. मात्र काही वैद्यकीय कारणास्तव त्यांचे रक्त घेतले गेले नाही. सुदैवाने तोपर्यंत त्यावेळी व्हिएतनाम येथीलच हा दुर्मीळ रक्तगट असलेल्या एका रक्तदात्याने रक्त दिले. ते बाळाला देण्यात आले आहे. या दोघांचे रक्त का घेतले गेले नाही याचे वैद्यकीय अहवाल तपासण्याचे काम सुरू आहे.
बाळ सुखरूप
बाळाला रक्त दिल्यानंतर ते सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉम्बे रक्तगटाचा शोध १९५२ साली मुंबईत लागला. त्यानंतर आपल्या शहरात हा दुर्मीळ रक्तगट असल्याची नोंद ठेवली जाते. अनेक वेळा परदेशातून अशा पद्धतीने या दुर्मीळ रक्तगटाची मागणी होत असते.