मुंबई- शिवसेनेपाठोपाठ इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना शिंदे गटात सामावून घेण्याचा धडाका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन या बंगल्यावर दिवसेंदिवस शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यात मूळ शिवसेनेसोबतच इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा भरणा आहे. त्यातच पनवेल, खारघर या भागातील ६५ हून अधिक मनसे कार्यकर्त्यांनी माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश केल्याची बातमी समोर आली.
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरेंनाही धक्का दिल्याचं बोलले गेले. त्यानंतर आता मनसेकडून खुलासा झाला आहे. मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी त्यांच्या अधिकृत पेजवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात शिंदे गटात झालेला पक्षप्रवेश हा निव्वळ फसवणूक होती. जवळपास ३०-४० कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार असल्याचा बहाणा करत सोबत घेऊन गेले होते असा दावा व्हिडिओतील कार्यकर्त्यांनी केला.
मनसे पदाधिकारी रवी पवार आणि रोहित कोरडे यांनी व्हिडिओ बनवत याचा खुलासा केला आहे. आम्ही शिंदे गटात प्रवेश केल्याचं वृत्त खोटं असून ती निव्वळ फसवणूक होती. अतुल भगत यांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटून निवदेन द्यायचं आहे. चर्चा करायची आहे असं सांगितले. आमच्यासोबत ३०-४० कार्यकर्ते होते. तिकडे गेल्यावर आम्हाला सांगितले आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे. परंतु आम्ही यास नकार दिला. आम्ही राजसाहेबांसोबत आहोत. राजसाहेब हे आमचे दैवत आहेत आणि राहतील. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं कार्यकर्त्यांनी व्हिडिओत म्हटलं.
काय आहे प्रकरण?मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. मागील ८ वर्षापासून ते जिल्हा अध्यक्षपदावर कार्यरत होते. मनसेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह एकूण ६५ जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश घेतला होता. मनसेमधली अंतर्गत धुसफूस यासाठी कारणीभूत असल्याचं समोर आली होती.
"शिंदे गटाचं अस्तित्व केवळ..."शिंदे गटात प्रवेश करणारे हे मनसेचे पदाधिकारी नव्हते. ३ महिन्यापूर्वी ज्यांना काम करत नव्हते म्हणून काढले होते त्यांना प्रवेश दिला गेला असा टोला मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लगावला होता. सध्या शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचं पाहिले तर ज्यांना पदावरून काढले होते त्याने आमचं नुकसान काहीच नाही. शिंदे गटाला माणसं हवीत. ठाणे शहर काही परिसर सोडला तर फारसं अस्तित्व शिंदे गटाचं नाही. ज्याला ३ महिन्यापूर्वी पदावरून काढलं. त्याला शिंदे गटात प्रवेश दिला. हजारो लोक आमच्याकडे येतात तसे काही जातातही. ८ वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून जो परिणामकारक निकाल देत नसेल तो त्यांच्याकडे गेला तरी काय अपेक्षा करणार आहे? असा टोला जाधव यांनी लगावला होता.