मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तील 'रोखठोक'मध्ये आपली तुलना हिटलरशी करण्यात आल्यानंतर योगी यांनी हा पलटवार केला. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने 'सावत्र आई' होऊन मजुरांना आश्रय दिला असता तर ते उत्तर प्रदेशात परत आले नसते. त्यानंतर, आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही योगी आदित्यनाथ यांना आई शब्दावरुन वापरलेल्या भाषेत सांगितलंय.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर उत्तर प्रदेशातील मजूरांबाबतच्या मुद्द्यावर एका पाठोपाठ एक, अनेक ट्विट करण्यात आले आहेत. एका ट्वीटमध्ये संजय राऊतांना टॅग करत म्हणण्यात आले आहे, की 'एक भूकेले मूलच आपल्या आईला शोधते. जर महाराष्ट्र सरकारने 'सावत्र आई' होऊनही आश्रय दिला असता, तर महाराष्ट्राला बळकट करणाऱ्या आमच्या उत्तर प्रदेशातील रहिवाशांना पुन्हा उत्तर प्रदेशात येण्याची गरज भासली नसती.'
योगी आदित्यनाथ यांच्या या ट्वटिनंतर उत्तर प्रदेशातील मजूरांवरुन महाराष्ट्रातील नेते व योगी आदित्यनाथ यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी, यापुढे उत्तर प्रदेशातील मजूर नेण्यासाठी परवानगी घेण्याचीही अट आदित्यनाथ यांनी घातली आहे. त्यास, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उडी घेत, यापुढे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वच कामगारांची नोंद व्हावी, असे राज्य सरकारला सूचवले आहे. आता, योगी आदित्यनाथ यांनी सावत्र आईसंदर्भात केलेल्या वादात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उडी घेतली आहे. बाळासाहेब यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत, योगी आदित्यनाथ यांनी आई अन् मावशीचं नात समजावून सांगितलंय.
'उत्तर प्रदेशातले सत्ताधारी रोजगार निर्माण करू शकले नाहीत म्हणून तिथले लोक महाराष्ट्रात येतात. आई सांभाळत नाही म्हणून मावशीकडे येतात. दोन महिने त्यांच्याकडे काम, पैसा नसताना मावशीने त्यांना व्यवस्थित सांभाळले. हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath यांनी समजून घ्यावे', असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.