Join us

ते तर बाळासाहेबांची निशाणी गोठवायला निघाले; केदार दिघेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 2:53 PM

शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केल्यामुळे आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात संघर्ष वाढला आहे

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वादामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. त्यातच हा वाद सुप्रीम कोर्टापासून केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. त्यात खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, यातच आता एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी सुप्रीम कोर्टात केली आहे. आता, या मागणीवर शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना नेते केदार दिघे यांनीही या मागणीवरुन शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. 

शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केल्यामुळे आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात संघर्ष वाढला आहे. आतापर्यंत शिवसेना आमचीच, धनुष्यबाण आमचाच असा दावा शिंदे गटाकडून वारंवार करण्यात येत होता. परंतु पहिल्यांदाच घटनापीठाकडे सुनावणी घेताना शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवा अशी मागणी केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घ्या अशी मागणीही शिंदे गटाचे वकील कौल यांनी केली. त्यानंतर, शिवसेना नेत्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 

आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे धनुष्यबाण चिन्ह गोठवा म्हणतात, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केला. शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले? बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे, आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे, बाळासाहेबांचीच निशाणी गोठवायला निघाले आहेत, अशा शब्दात केदार दिघे यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे. तर, खासदार अरविंद सावंत, आमदार मनिषा कायंदे, आमदार वैभव नाईक यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

जनाची नाही तर मनाची ठेवावी

अमित शहा मुंबईत आल्यावर ज्या पद्धतीने बोलले, यापूर्वी भरत गोगावलेही बोलले होते की, ५ वर्षे निकालच लागणार नाही. या विधानांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीरतेनं दखल घेतली पाहिजे. देशाचे गृहमंत्री येथे येऊन सांगतात की, शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. त्यावेळी, लोकं दाढीवर हात ठेऊन बघत असतात, असे म्हणत सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांचं नेतृत्व फुलवलं, त्यांना जनाची नाही तर मनाची तरी असायला हवी होती, असा घणाघात सावंत यांनी केला. 

शिंदेंच्या अगोदरच दिघेंकडून पाटपूजन

ठाण्यातील टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवातील अंबे मातेची मूर्ती आजपासून घडवण्यास सुरुवात झाली. त्याच मूर्तीचा पाट पूजनाचा मुहूर्त होता. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधीच केदार दिघेंनी हजेरी लावली. त्यावेळी, नारळ फोडून पाटपूजनही केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाट पूजन केलं. त्यामुळे, टेंभी नाका येथील नवरात्रौत्सव कोणाचा हा वाद आता उफाळून येत आहे. एकीकडे दसरा मेळावा कोणाचा हा वाद चर्चेत असताना, आता दिघेंनी नारळ फोडल्याने आणखी दुसरा वाद निर्माण झाला आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेसर्वोच्च न्यायालयशिवसेनाअरविंद सावंत