मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे बोलण्यासारखे काहीच उरलेले नाही. त्यामुळे जिथे जातील तिथे खोके खोके एवढेच ते बोलत राहतात. अडीच वर्षात जी कामे त्यांनी थांबवली होती, ती सगळी आमच्या सरकारने मार्गी लावली. त्यामुळे त्यांच्याकडे आता बोलण्यासारखे काहीही उरलेले नाही. म्हणून ते सातत्याने एकच एक बोलत राहतात, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि सह व्यवस्थापकीय तथा संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. लोकमत पार्लमेंटरी पुरस्काराच्या निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या परिसंवादाचे तसेच यवतमाळ येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठीचे निमंत्रण विजय दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. त्यावेळी विविध विषयांवर शिंदे यांनी आपली स्पष्ट मते मांडली. यावेळी लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या सहा महिन्यांत किती कामे मार्गी लावली, याची यादी पाहिली; तर आमचे सरकार वेगाने काम करत आहे हे लक्षात येईल. समृद्धी महामार्ग पूर्ण झाला. मेट्रो रेल्वे सुरू झाली. कोस्टल रोडचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई (उलवे) हे अंतर वीस मिनिटांत पूर्ण होणार असून हा रस्ता या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. अडीच वर्षात कोणत्या फाईली कशा थांबल्या हे सगळ्यांना माहिती आहे. आमचे सरकार दिवस-रात्र काम करत आहे. पण त्यांना आता कामाबद्दल बोलायचे नाही, तर निष्कारण आरोप करायचे आहेत. त्यांचे आरोप त्यांच्याजवळ. आमचे कामच बोलेल..! अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारचा रोड मॅपच समोर ठेवला.
लोकमतच्या वतीने चेअरमन विजय दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विजय दर्डा यांचे वर्षा निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.