मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर जोरदार प्रहार केला. आज मी अस्वस्थ आणि उद्विग्न आहे, आरोग्य यंत्रणेचे बारा वाजलेत ते बघितल्यानंतर संताप येतोय. जगभरात कोरोनाचं संकट होतं, तेव्हा महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री होतो. कोरोना काळात हीच आरोग्य यंत्रणा होती, परंतु सरकार बदलल्यानंतर आरोग्य यंत्रणेची दुर्दशा झालीय. याच आरोग्य यंत्रणेने जीवाची बाजी लावून कोरोना काळात काम केले, औषधे दुर्गम भागात पोहचवण्याचे कामही याच यंत्रणेने केले होते पण योद्धासारखे लढणाऱ्यांना आज बदनाम केलं जातेय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी राज्य सरकारवर घणाघात केला. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, नांदेड, नागपूर, ठाणे अजूनही अनेक ठिकाणच्या बातम्या येतायेत, या शासकीय रुग्णालयातील मृत्यूंना जबाबदार कोण? इथे हॉस्पिटलमध्ये मृत्यू होताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत बसलेत. जेवढे बळी नक्षली हल्ल्यात गेले नसतील तितके शासकीय रुग्णालयात गेले आहेत. मुख्यमंत्री आणि २ हाफ उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी करून त्याचे कारण शोधले पाहिजे होते. जे गुन्हेगार असतील तर त्यांना शिक्षा द्या, पण नांदेडच्या डीनवरच कारवाई का? नागपूर, ठाणे इथल्या डीनवर कारवाई नाही. हे संशयास्पद आहे. धमकावण्यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय का? रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. आरोग्य खाते विभागले गेलेत. बाहेरून औषधे खरेदी करा असं सांगितले जातंय. केंद्र, राज्य शासनाच्या योजनेतून औषधांची खरेदी होऊ शकते. कोरोना काळात औषधांचा तुटवडा नव्हता, सध्या भ्रष्टाचाराची साथ आहे असा आरोप त्यांनी केला. यावेळी, त्यांनी फडणवीसांच्या दिल्ली वारीवरुन तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या गणेशोत्सवातील दौऱ्यावरुनही टीका केली.
उद्धव ठाकरेंनी १ फूल दोन हाफ म्हणत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. यावेळी, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले आहे, नक्षलग्रस्तांची बैठक आहे तिकडे, ते महत्त्वाचं आहे. पण, नक्षली हल्ल्यापेक्षा जास्त माणसं सरकारी रुग्णालयात मरत आहेत, मग इकडे कोण पाहणार, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. तसेच, ह्यांना फक्त मिरवायला पाहिजे, गणपतीमध्ये हे मिरवत होते सगळीकडे, गणपतीमध्ये नागपूरमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं, पण हे बॉलिवूडवाल्यांना बोलावून मिरवत होते. ज्यांच्या घरात पाणी शिरलं ते हिंदू नव्हते का, तेव्हा जबाबदारी घ्यायला का पुढे आले नाही, असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारले. तसेच, एकनाथ शिंदेंना टोलाही लगावला.