माझ्या मित्राची हत्या केली; तेलंगणातील भाजपा आमदाराने सांगितली शरद मोहळची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 03:54 PM2024-01-07T15:54:21+5:302024-01-07T15:55:01+5:30
भाजपा नेते आणि आमदार राजा सिंह यांनी शरद मोहोळची आठवण सांगितली.
मुंबई/सोलापूर - पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. याप्रकरणी गोळ्या झाडणाऱ्या साहिल पोळेकरसह त्याला मदत करणाऱ्या ८ जणांना अटक करण्यात आली. दहा वर्षांपूर्वी झालेल्या मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी साहिलने मामासह कट रचून मोहोळचा गेम केल्याचे उघड झाले असून, या कटात दोन वकिलांचाही हात असल्याचे पुढे आले आहे. या घटनेनंतर पुण्यात पोलिसांनी कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात केला असून पोलिसांकडून घटनेचा कसून तपास सुरू आहे. मात्र, शरद मोहोळ हा हिंदुत्ववादी होता, माझा मित्र होता, असे म्हणत तेलंगणातील भाजपा नेते आणि आमदार राजा सिंह यांनी शरद मोहोळची आठवण सांगितली.
शनिवारी सोलापूरात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चानंतर आयोजित सभेत बोलताना तेलंगणाचे आमदार टी.राजा सिंह ठाकूर यांनी शरद मोहोळची आठवण सांगितली, तसेच शरदभाऊ माझा मित्र होता, असेही ते म्हणाले.
''जेव्हा पुण्याचा विषय निघाला, तेव्हा एक वाईट बातमी ऐकायला मिळाली. मी सासवडला जाणार होतो, तेव्हा मला समजलं की माझ्या मित्राची हत्या करण्यात आली. शिर्डीच्या श्रीरामपूरमध्ये शरद मोहोळ आणि मी यांनी धर्मसभेला संबोधित केलं होतं. ज्या व्यक्तीने स्वत:चं आयुष्य धर्म, देश आणि गोरक्षासाठी व्यतीत केलं. ज्या व्यक्तीने तुरुंगात एका दशतवाद्याला सदगुरुकडे पाठवलं होतं. त्या शरदभाऊंना आपल्या काही गद्दारांनी ठार मारलं,'' असे आमदार राजासिंह यांनी म्हटलं.
''शरद मोहोळ याची पत्नीही हिंदुवादी आहे, त्या आज आपल्या मंचावर येणार होत्या. मात्र, ही दु:खद घटना घडली. आपण सर्वजण मिळून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करू, असे म्हणत आमदार राजासिंह यांनी शरद मोहळ यांना सोलापूर श्रद्धांजली वाहिली. आई तुळजाभवानी मातेनं शरदभाऊंना पुन्हा या भूतलावावर जन्म द्यावा, कुणाच्या घरी त्यांचा जन्म व्हावा आणि त्यांचं अर्धवट राहिलेलं हिंदुत्त्वाचं काम पूर्ण करावं,'' अशी प्रार्थनाही त्यांनी तुळजाभवानी चरणी करत असल्याचं म्हटलं.
दरम्यान, या खून प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल किसन गांदले, अमित मारुती कानगुडे, नामदेव महिपत कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, ॲड. रवींद्र वसंतराव पवार आणि ॲड. संजय रामभाऊ उडान यांना अटक झाली. वकिलांना ८ व बाकी आरोपींना १० जानेवारीपर्यंत पर्यंत पोलिस कोठडी मिळाली.