मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील यादवनगर येथील सहकार रोडवरील शौचालयाचे काम अर्धवट राहिल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. तसेच शौचालयाचे काम थांबल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले होते. सहा हजार लोकसंख्या असलेल्या परिसरात फक्त दहा शौचालये असल्याने रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. तसेच नव्या शौचालयाचे काम दहा महिन्यांहून अधिक काळ रखडलेल्या स्थितीत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच, प्रशासनाने याची दखल घेतली आणि बांधून पूर्ण झालेले शौचालय अखेर खुले केले.शौचालयाचे उद्घाटन खासदार गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते करण्यात आले. शौचालय सुरू करण्यात आल्याने ४०० ते ४५० कुटुंबांची गैरसोय दूर झाली आहे. नवे शौचालय तळमजला अधिक एक असे असून, त्यात ४६ शौचकूप आहेत. यातील चार शौचकुपे अपंगांसाठी आहेत. तळमजल्यावरील शौचालय महिलांसाठी असून, पहिल्या मजल्यावरील शौचालय पुरुषांसाठी आहेत, अशी माहिती स्थानिक नगरसेविका शाहेदा हारुन खान यांनी दिली.
‘ते’ शौचालय अखेर खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 4:48 AM