"ते त्यांच्या मर्जीचे मालक"; वंचितच्या प्रश्नावर फडणवीसांचा सावध पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 04:52 PM2024-03-19T16:52:57+5:302024-03-19T16:58:10+5:30
मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत असणार की ...
मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत असणार की नाही, यावरही अद्याप निर्णय झाला नाही. महाविकास आघाडीतील नेते वंचितला सोबत घेण्यासाठी आग्रही असल्याचं सांगात, पण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे पत्र किंवा माध्यमांना प्रतिक्रिया देऊन आपली नाराजी उघड करत आहेत. नुकतेच, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहीत आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांवरील विश्वास उडाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना व्हीबीएसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर, फडणवीसांनी उत्तर देताना ते त्यांच्या मर्जीचे मालक असल्याचं म्हटलं.
आम्ही काँग्रेसला सात लोकसभा मतदारसंघांमध्ये आमचा संपूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहोत. काँग्रेसने आपल्या निवडीच्या कोणत्याही सात जागा सुचवाव्यात, त्या जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ, असं पत्र प्रकाश आंबेडकर यांनी मल्लिकार्जुन खर्गेंना लिहंल आहे. वंचित बहुजन आघाडीकडून जास्तीच्या जागा मागण्यात येत असल्याने महाविकास आघाडीसोबत ते येतील की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यातच, वंचितकडून निवडणुकांत भाजपला मदत होते, असा आरोपही त्यांच्यावर अनेकदा केला जातो. त्याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, फडणवीसांनी उत्तर देताना प्रकाश आंबेडकर हे वरिष्ठ नेते असल्याचं सांगत कुठलाही टीका करण्याचे टाळले.
That's your job, not ours...
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 18, 2024
ते तुमचे काम आहे, आमचे थोडी काम आहे...
वो आपका काम है, हमारा थोड़ी काम है...
(बदलाव हमसे है - न्यूज18 लोकमत | मुंबई | 07-03-2024)#Maharashtra #Politics#BJPpic.twitter.com/z6Ff9CfZzi
एक एनडीए आहे, एमव्हीए आहे, आणि एक व्हीबीए देखील आहे. त्यांची काय भूमिका आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकरांचे नाव न घेता, ते वरिष्ठ नेते आहेत, ते त्यांच्या मर्जीचे मालक आहेत, असे म्हणत त्यांच्यावर थेट टीका करणे टाळले. व्हीबीएची भूमिका काय हे त्या पक्षाचे मालकच सांगू शकतील. कारण, त्या पक्षाचे मालक हे त्यांच्या मर्जीचे मालक आहेत. एमव्हीएसोबत त्यांची चर्चा सुरू आहे, जोपर्यंत ती चर्चा सुरू आहे, तोपर्यंत आहे, जर नाही झाली तर नाही, जर झाली तर होईल, असे फडणवीसांनी म्हटलं.
ते वरिष्ठ नेते - फडणवीस
व्हीबीए मुखवटा कोणाचा तरी परिधान करते आणि बाण दुसऱ्या कोणाचे तरी चालवते, असे त्यांना म्हटले जाते, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, ते वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबाबती असं म्हणणं योग्य नाही, असे म्हणत फडणवीसांनी ते भाजपाला मदत करत असल्याबाबतच्या प्रश्नावर थेट उत्तर दिले.
प्रकाश आंबेडकरांनी खर्गेंना लिहिलेल्या पत्रात काय
महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांचा वंचित बहुजन आघाडीविषयी असलेल्या चुकीच्या दृष्टीकोनामुळे आमचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे," अशा शब्दांत आंबेडकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, "हुकूमशाही, विभाजनकारी आणि लोकशाहीविरोधी भाजप-आरएसएसचं सरकार घालवण्याचा आमचा मुख्य अजेंडा अजूनही कायम आहे. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रातील सात जागांवर मी वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला मिळालेल्या कोणत्याही सात जागांची आपण मला यादी द्यावी. आमचा पक्ष तुम्ही निवडलेल्या या सात जागांवर काँग्रेसला संपूर्ण पाठिंबा देईल."