शवविच्छेदनगृहात काम करणारे पडद्यामागील कोरोना योद्धे
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आजूबाजूला मृतदेहाचा खच. त्यातून मृतदेह उचलून स्ट्रेचरवर ठेवायचे, नंतर डॉक्टरांच्या उपस्थितीत त्याचे शवविच्छेदन करायचे. नंतर छिन्नविच्छिन्न मृतदेह पुन्हा कापडात गुंडाळून जवळचा व्यक्ती गेला म्हणून टाहो फोडणाऱ्या नातेवाईकाच्या हातात सोपवायचा. हा दिनक्रमच आहे, शवागृहातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा. रोज किमान चार ते पाच मृतदेह शवविच्छेदनासाठी ठरलेले असतात. फक्त आपल्या हातून कुठली तरी सेवा होते, या सकारात्मक विचारांची गाठ मनाशी बांधून ते ऑन ड्युटी २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत.
मुंबईत सर जे. जे. रुग्णालयासह घाटकोपरमधील राजावाडी, कुपर, गोरेगावातील सिद्धार्थ आणि बोरिवलीच्या भगवती या पाच रुग्णालयात शवविच्छेदन केले जाते. या शवागृहांमध्ये नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस आपली सेवा बजावत आहेत. यातील जे.जे. रुग्णालयातील शवागृहात दक्षिण मुंबईतील १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले जातात. याच शवागृहात गेल्या ११ वर्षांपासून मोर्चुरी असिस्टंट म्हणून काम करणारे, सचिन मयेकर जे जे कामगार वसाहतीत पत्नी आणि सात७ वर्षांच्या मुलांसोबत राहतात. ते पोलीस शल्य चिकित्सक कार्यालयातून येथे नियुक्तीवर आहेत. पोलिसांकडून मृतदेह येताच त्याच्या नोंदणी करण्यापासून मृतदेहाचे शवविच्छेदन होण्यापर्यंत लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. २४ तास सेवा २४ तास आराम असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे. यात न घाबरता, न तक्रार करता त्यांची सेवा सुरू आहे. तर मी फक्त माझे कर्तव्य बजावतो, असे मयेकर सांगतात.
......
सुरूवातीला मृतदेह कापताना हात थरथरले
याच शवशल्यगृहात कटरचे काम करणारे श्याम वाघे सांगतात, सुरुवातीला मृतदेह कापताना हात थरथरले. भीती वाटली. जेवण घशाखाली उतरत नव्हते. सुरुवातीचे तीन ते चार महिने भीती कायम होती. आई-वडिलांनी नोकरी सोडण्यासाठी तगादा लावला. मात्र वरिष्ठांंनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यावेळी कामी आले. तसेच आपल्या केलेल्या कामातून कुणाला तरी न्याय मिळतो, ही भावना मनात आली. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास प्रश्नाना, भीतीला जागा मिळत नसल्याचेही ते नमूद करतात. ते गेल्या ११ वर्षांपासून हे काम करीत आहेत.
...