Join us

'त्यांनी' बंद पाडले आपला दवाखान्याचे काम! दोन महिन्यांपासून लागलाय ब्रेक

By मनोहर कुंभेजकर | Published: May 10, 2023 7:09 PM

 अंधेरी पूर्व मरोळ येथे आपला दवाखाना सुरू करण्यासाठी ब्रेक लागला असून गेली दोन महिने सदर काम ठप्प आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून येथे आपला दवाखाना लवकर सुरू करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुंबईसह राज्यात व ग्रामीण भागात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दि,17 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. ही योजना सुरू झाल्या पासून आतापर्यंत 7 लाख 2 हजार 252  रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी व औषध उपचाराचा लाभ घेतला.मात्र अंधेरी पूर्व,मरोळ पाईप लाईन येथील या योजनेला ब्रेक लागणल्याने येथील सुमारे 50000 नागरिक या योजनेपासून वंचित आहेत.

 अंधेरी पूर्व मरोळ येथे आपला दवाखाना सुरू करण्यासाठी ब्रेक लागला असून गेली दोन महिने सदर काम ठप्प आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून येथे आपला दवाखाना लवकर सुरू करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

पालिकेने दोन महिन्यापूर्वी अंधेरी पूर्व, मरोळ पाईप लाईन,रामलिला मैदान परिसरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्याचे काम सुरू केले होते. मात्र विमानतळ प्राधिकरणाच्या सुरक्षा रक्षकांनी याला हरकत घेत सदर काम बंद पाडले. पालिका अधिकाऱ्यांनी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला असता, त्याला देखिल त्यांनी ब्रेक लावला.

याप्रकरणी शिंदे गटाचे उपनेते कमलेश राय यांनी सांगितले की,विमानतळ प्राधिकरणाच्या सुरक्षा रक्षकांच्या दादागिरीमुळे येथील सुमारे 50000 नागरिक सुविधांपासून वंचीत आहे.त्यांनी येथे आपला दवाखाना सुरू करण्यासाठी बाधा आणली असल्याने येथील लोकप्रतिनिधी त्रस्त आहेत.

येथे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यासाठी पोलिस, पालिका आणि विमानतळ प्राधिकरणाकडे आपण पत्र व्यवहार केला.मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

आपण येत्या दि,12 मे रोजी शिवसेना-भाजप युतीच्या संयुक्त विद्यमाने येथे मोर्चा व धरणे आंदोलन आयोजित केले आहे.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची  देखिल भेट घेणार असून त्यांना येथे आपला दवाखाना सुरू करण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे कमलेश राय म्हणाले.

या प्रकरणी स्थानिक आमदार अँड.पराग अळवणी यांच्याशीसंपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,माझ्या आमदार फंडातून सुद्धा शौचालयाचे काम करतांना सुद्धा विमानतळ प्राधिकरणाच्या सुरक्षा रक्षकांनी काम बंद पाडले. विशेष म्हणजे कंत्राटदाराकडून पैशाची मागणी केली जाते. 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबईहॉस्पिटल