Join us

...ते शिंदे गटाचा विश्वासघात करतायत, सांभाळून राहा; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला सूचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 1:45 PM

आज राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले.

मुंबई-राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या संदर्भात आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीतील शरद पवार गटाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

"आरक्षण द्या, विशेष अधिवेशन बोलवा"; सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे आमदार पायऱ्यावर

यावळी खासदार सुळे यांनी अजित पवार गटातील नेत्यांनी विनंतीही केली. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दगाफटका केला आहे. मराठा, लिंगायत, धनगर समाजाला त्यांनी दगा दिला आहे. याला पूर्ण जबाबदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आता त्यांनी एकनाथ शिंदेंनाही दगाफटका केला आहे, एका वकीलाचे स्पष्टीकरण आले आहे.ते  म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर आम्ही त्यांना एमएलसी करु, म्हणजे यांना ते अपात्र होणार आहेत हे माहित होतं. म्हणजे अगोदर उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, आता ते त्यांचा घटक पक्षालाही दगा देत आहे. यामुळे माझी अजित पवार गटाला एक विनंती आहे, आपण कधीतर एका ताटात जेवलो आहे, ते आता शिंदेंनाही धोका देत आहे. त्यामुळे सांभाळून राहा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

"बीडमध्ये आरक्षणासाठी झालेली जाळपोळ हे गृहखात्याचं फेल्युअर आहे. गृहमंत्री बाहेरच्या राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला जातात. त्यांना राज्यात लक्ष द्यायला वेळ नाही. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. राजकारण एकाबाजूला असतं. राज्यात माणुसकी राहिली आहे की नाही. भाजपला फक्त मतांच राजकारण करायचे आहे, असा आरोपही सुळे यांनी केला.  

"आरक्षण द्या, विशेष अधिवेशन बोलवा" 

 

राज्यातील मराठा आंदोलक हिंसक होत असून आज सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वत: उपस्थित आहेत. एकीकडे ही बैठक सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांनी विधानभवन पायऱ्यावर आंदोलन केले. सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, त्यासाठी एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आमदार जिंतेद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे.  

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन कालपासून विधानसभा आणि मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या आमदारांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आमदारांनी काही वेळापूर्वीच मंत्रालयाच्या गेटला टाळे ठोकून ते पायऱ्यांवरच आंदोलनाला बसले होते. या सर्वपक्षीय आमदारांना पोलिसांनी व्हॅनमध्ये घालून नेले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून लक्षवेधी आंदोलन केले. मराठा समाजास आरक्षण देण्याच्या दृष्टीने, तात्काळ एकदिवसीय अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. या मागणीसाठी खा. सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड आ.रोहित पवार, आ. शशिकांत शिंदे, नरेंद्र दराडे, विलास पोतनीस, प्रकाश फातर्पेकर यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. 

टॅग्स :सुप्रिया सुळेअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसएकनाथ शिंदेमराठा आरक्षण