Mumbai: घरात बसून जेवायचे, शतपावली करत खाली येऊन मतदान करायचे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 08:56 AM2024-04-20T08:56:33+5:302024-04-20T08:56:48+5:30
मुंबईतील ६३ हाउसिंग सोसायट्यांची यादी केली अंतिम
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उंच टॉवरमध्ये राहणाऱ्या मतदारांना आता घरात बसून जेवायचे आणि शतपावली करत खाली येवून मतदान करायचे अशी व्यवस्था निवडणुक आयोगाने केली आहे. त्यावर एका अधिकाऱ्याने, ‘निचे पान की दुकान, उपर गोरी का मकान...’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मतदानाची उदासीनता लक्षात घेत निवडणूक आयोगाला काय काय करावे लागेल याचा नेम नाही. मुंबईत थेट बिल्डिंगखालीच मतदान केंद्र उभारण्याला प्राधान्य दिले असून, शहरातील निवडक ६३ हाउसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारण्याचे निश्चित केले आहे. मतदानवाढीसाठी निवडणूक आयोग विविध पद्धतीच्या योजना राबवित आहे. त्याचा एक भाग म्हणून प्रथमच हौसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहे. सर्व निकष बघूनच मतदान केंद्रे अंतिम केली जात आहेत. त्या ठिकाणच्या रहिवाशांशी संवाद साधूनच केंद्र अंतिम केली जात असल्याचे शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले. यंदा प्रथमच ८५ पेक्षा अधिक वयाच्या मतदारांना घरूनच मतदान करता येणार आहे.
मतदान केंद्राबाहेर मतदारांना रांगेत उभे राहावे लागणार नाही याची काळजी घेतली जाणार असून, त्यानुसार मतदारांना टोकन नंबर देण्यात येणार आहे. टोकन घेऊन मतदारांना बसण्याची सोय केली जाईल. त्यांचा क्रमांक आला की त्यांनी मतदानास जाता येईल.
उपनगरांत १७ ठिकाणी
उपनगरांत ४ विधानसभा मतदारसंघातच उंच इमारतींमध्ये मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे अंधेरी पश्चिम , वांद्रे , विलेपार्ले, मानखुर्द , शिवाजीनगर या ठिकाणी ही अशी मतदान केंद्र उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
विधानसभानिहाय निवडक सोसायट्या
धारावी : वैभव को-ऑपरेटिव्ह सोसायटी, अभ्युदय बँकेसमोर, धारावी क्रॉस रोड.
सायन कोळीवाडा : अल्टिया लोढा न्यू कफ परेड, अँटॉप हिल
वडाळा : सेंट्रम टॉवर, तळमजला, वाहनतळ.
माहीम : मकरंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शेफाली बिल्डिंग, तळमजला.
वरळी : लोखंडवाला रेसिडेन्सी, वाहनतळ, गांधी नगर
मलबार हिल : अर्थ प्राइड सोसायटी, वाहनतळ, खाडीलकर रोड.
मुंबादेवी : नवजीवन सोसायटी कंपाउंड, मुंबई सेंट्रल
कुलाबा : नथुराम पोद्दार बाग, तळ मजला, बाबासाहेब जयकर मार्ग.