Join us

... ते तुटतील पण वाकणार नाहीत, रोहित पवारांनी भाजपला सांगितलं राजकारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 6:38 PM

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी आरे कारशेडच्या प्रकल्पावरुन आणि पोलिसांसदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानावरुन उद्धव ठाकरे व राज्य सरकारला लक्ष्य केले.

ठळक मुद्दे''विरोधी पक्षातील अनेक नेते शिवसेनेला कुठंतरी आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण, मला विरोधी पक्षांना एक गोष्ट सांगायचीय. ज्याप्रमाणे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव तुम्ही घेतलं, त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा घेतो

मुंबई - राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी तरुण आमदार म्हणून विधानसभेत प्रश्न मांडणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना, विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांवर टीका केली. भाजपाकडून शिवसेनेला आपलंसं करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत, भाजपाने तसा प्रयत्न करुन काहीही उपयोग नसल्याचे म्हटले. कारण, शिवसेना आमदार हे बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याप्रमाणेच निर्णयावर ठाम असणार आहेत, असे रोहित यांनी म्हटले. 

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी आरे कारशेडच्या प्रकल्पावरुन आणि पोलिसांसदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानावरुन उद्धव ठाकरे व राज्य सरकारला लक्ष्य केले. तर, काही भाजपा नेत्यांनी शिवसेनेला पुन्हा सोबत येण्याचे अप्रत्यक्षपणे सूचवलं. यावरुन, आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. 

''विरोधी पक्षातील अनेक नेते शिवसेनेला कुठंतरी आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण, मला विरोधी पक्षांना एक गोष्ट सांगायचीय. ज्याप्रमाणे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव तुम्ही घेतलं, त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा घेतो. बाळासाहेब ठाकरे निर्णयाला ज्याप्रमाणे ठाम राहिले असते, त्याचप्रमाणे त्यांचे हे सर्व कार्यकर्तेही ठाम राहतील, असा विश्वास मला वाटतो. ते तुटतील पण तुमच्यासमोर वाकणार नाही, त्यामुळे कुणीही असा प्रयत्न करू नये,'' असा टोलाच आमदार रोहित पवार यांनी भाजपाला लगावला. 

''मी पुन्हा येईनवरुन रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. कुणीतरी म्हटलं शिवसेनेनं आमच्यासोबत यावं, पण मी लहानपणापासून जे काही मराठी शिकलोय, याचा अर्थ केवळ व्यक्तीगत बोलल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे, आम्ही पुन्हा येईन म्हटले असते तर त्यात चंद्रकांत पाटील आले असते, इतर आमदारही आले असते. त्यात, शिवसेनेचाही समावेश झाला असता, त्यांनाही वाटलं असती की भाजपाची तीच इच्छा आहे, असे म्हणत रोहित यांनी फडणवीसांना टोला लगावला. 

फडणवीसांकडून उद्धव ठाकरे लक्ष्य

मुंबई पोलिसांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी राज्याचा गृहमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत मला पूर्ण कल्पना आहे. मात्र कधी कधी राजकीय हितसंबधांचा प्रभाव पोलिसांच्या कामगिरीवर होतो. आता पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याबाबत म्हणाल तर या सभागृहामध्येही अनेकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही काळापूर्वी कल्याणच्या सभेत राज्यातील पोलीस हे भांडी घासायच्या लायकीचे आहेत, असे विधान केले होते. भूमिका बदलल्या की आपण कसे बदलतो याचं हे एक उदाहरण आहे. चर्चा करायची असेल, विषयांतर, विषय बदलायचे असतील तर ते कसं काय बदलता येतात हे आपण बघितलं आहे.  

टॅग्स :रोहित पवारदेवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेना