मुंबई : ‘लोकांची नावे, मोबाइल नंबर देऊन पीएफआय संघटनेचे सदस्य असून भारतात दंगली घडवण्याचा डाव रचत असल्याच्या माहितीचे अर्ज वाढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील नेते आणि पोलिस ठाण्यात शेकडो अर्ज आले होते. याच अर्जाचा भोईवाडा पोलिसांनी शोध घेताच, एक अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत, मुख्य सूत्रधार रागातून मुलाच्या मार्फत खोटी माहिती पसरवत असल्याचे समोर आले. भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवत मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यभरातील पोलिस ठाण्यात आरोपीकडून पोस्टाने अर्ज येत होते. या अर्जामध्ये अनेक लोकांची नावे व मोबाइल नंबर देऊन पीएफआय एजंट भारतात दंगली घडवण्याचा डाव रचत आहेत. त्यांचे मंदिर, मस्जिद, चर्च हे टार्गेट आहेत. ते जम्मू-काश्मीर येथून मुंबईत आले असून मुंबई शहर आणि उपनगरात दंगली घडवणार आहेत. ते त्यांच्या गावी प्रशिक्षण घेऊन मुंबईत घातपात घडवण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या दंगली घडवण्याबाबत बैठक झाल्या आहेत. अशा स्वरूपाच्या माहितीचा समावेश होता.
सूत्रधार अभिलेखावरील आरोपी
माहिती खोटी असल्याने पोलिसांनी अर्जाकडे गांभीर्याने घेतले नाही. भोईवाडा पोलिस ठाण्यातच १५ हून अधिक अर्ज मिळाले. अखेर, भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्रीरामसिंग पडवळ आणि एटीसीच्या पथकाने तपास सुरू केला. पोस्टाच्या स्टॅम्पनुसार ते अर्ज चेंबूरमधून येत असल्याचे समोर आले. पोलिसांनी हाच धागा पकडून चौकशी करताच एक लहान मुलगा हे अर्ज टाकत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीचा पर्दाफाश झाला. मुख्य सूत्रधार हा अभिलेखावरील आरोपी असून स्वतःला माथाडी कामगार अध्यक्ष असल्याचे सांगतो. शिवाय त्याच्या विरोधात कोणी गेल्यास तो त्यांना त्रास देण्यासाठी पीएफआय एजंट असल्याचे सांगून खोटी माहिती पसरवत असल्याचे समोर आले आहे.