कोल्हापुरात काल सोशल मीडियातून आक्षेपार्ह स्टेटस व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. यावेळी गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांना लाठिचार्ज करावा लागला. या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या गोंधळापाठिमागील बोलविता धनी कोण आहे याचा शोध घेणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरात दगडफेक, कडकडीत बंद, आक्षेपार्ह स्टेटसवरुन तणाव; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अगोदर अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर आणि आता कोल्हापुरात सोशल मीडियावर स्टेटस हे महाराष्ट्रात हे कसं सुरू झालं हे पहावा लागेल,यामुळे महाराष्ट्रातील जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी हे करत आहेत का हे पहाव लागेल. कायदा कुणीही हातात घेऊ नये असंही फडणवीस म्हणाले.
'कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, पूर्णपणे पोलीस बंदोबस्त आहे. या ठिकाणी कुणीही औरंग्याचे उदात्तीकरण करणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांचा बोलिवता धनी कोण आहे हे पहावा लागणार आहे. याचा शोध घ्यावा लागणार आहे, असंही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्याचं नाव नंबर एकला आहे, त्यावरही या असल्या प्रकारामुळे डाग लागतो. मी औरंग्याच्या उदात्तीकरणाला विरोध करतो, पण लोकांनी संतापामध्ये कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोल्हापूर शहरात दगडफेक, कडकडीत बंद
सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात परिसरात दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.
सोशल मीडियातील आक्षेपार्ह स्टेटस आणि मेसेज प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज, बुधवारी (दि. ७) कोल्हापूर शहर बंदची हाक दिली आहे. सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. आक्षेपार्ह स्टेटस ठेवून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे मेसेज व्हायरल करणा-यांवर कडक कारवाईची मागणी केली.