मी एड्स पेशंट आहे सांगताच चोराचे पलायन; महिलेने लढविली शक्कल, चोराची उडाली भंबेरी
By गौरी टेंबकर | Published: August 17, 2023 10:34 AM2023-08-17T10:34:13+5:302023-08-17T10:35:32+5:30
चोराचीच भंबेरी उडाली व त्याने तेथून पलायन केले.
गौरी टेंबकर – कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घरात चोर शिरल्यावर भल्याभल्यांची भांबेरी उडते आणि नेमके काय करायचे ते सुचत नाही. पण बोरीवलीमधील एका ५२ वर्षीय महिलेने मात्र हल्ला करण्यासाठी अंगावर धावून आलेल्या चोरापासून वाचण्यासाठी त्याला थेट मी एड्स पेशंट आहे असे सांगताच, त्यामुळे चोराचीच भंबेरी उडाली व त्याने तेथून पलायन केले.
गोराई परिसरातील एका सोसायटीत तक्रारदार वीणा पवार (नावात बदल) राहात असून सुमारे ३० वर्षांपासून त्या तेथे राहात आहेत. त्यांचा मुलगा व सून परदेशात कामासाठी वास्तव्य करून असतात, तर त्या एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात काम करत आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर त्या राहात आहेत.
१४ ऑगस्ट रोजी रात्री दोनच्या सुमारास त्या कसलासा आवाज आल्याने त्यांनी उठून पाहिले. तेव्हा एक २५ ते ३० वर्षांचा मुलगा तोंडाला आणि डोक्याला रुमाल बांधून त्यांना दिसला. पवार यांनी तू आत कसा शिरला? कोण आहेस? अशी विचारणा केली. तेव्हा मी गर्दुल्ला आहे, चोरी करायला आलोय असे तो म्हणाला. तसेच तो पवार यांच्या अंगावर त्यांना मारायला धावला व त्याने त्यांना धक्काबुक्कीही केली. एकट्या महिलेला पाहून तो आपल्यासोबत काहीतरी अप्रिय करेल याचा अंदाज त्यांना आला, तेव्हा त्यांनी त्याला मी एड्स पेशंट आहे असे सांगितले.
पवार यांना इतक्यात रक्ताची उलटी झाली, जी पाहून तो घाबरला आणि घराच्या दरवाजातून बाहेर पडत बाहेरून कडी लावून पसार झाला. त्यानंतर पवार यांनी शेजारी राहणाऱ्या महिलेला मोबाइलवरून फोन करत मदतीसाठी बोलावले. त्यानुसार शेजाऱ्यांनी पवार यांच्या दाराला लावलेली कडी काढली. या घटनेनंतर पवार घाबरल्या होत्या आणि त्याची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी बोरीवली पोलिसात अनोळखी चोराच्या विरोधात तक्रार दिली.
आम्ही याप्रकरणी अनोळखी चोराच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३२३, ३४१, ३८० आणि ५११ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच चोराचाही शोध सुरू असून अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. - निनाद सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बोरीवली पोलिस ठाणे.