मुंबई: विविध विकासकामांसाठी तसेच दुकानात येणाऱ्या लोखंडी साहित्त्यांचे ट्रक अडवून चालकाला हाताशी घेत लोखंडाची हेराफेरी करणाऱ्या दौलत रमेश चव्हाणला शिवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. एका टेम्पोतून माल उतरवत असताना गस्तीवरील पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे.
मानखुर्द परिसरात राहणारे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक विनायक कृष्णाजी गोडसे (५२) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत ही कारवाई केली आहे. गोडसे हे ऑर्डर प्रमाणे जालना, नाशिक, वाडा या ठिकाणी स्टील व लोखंडाची वाहतूक करण्याचा व्यवसाय करतात. २४ फेब्रुवारी रोजी त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला वाडा पालघर येथील मल्टी स्टील इंडस्ट्रिज येथुन १८ टन ७०० कि.ग्र.वजनाचे विविध आकाराचे स्टिलचे बार,, अँगल्स लोड करून ते कुंभारवाडा येथील दुकानात देण्याची ऑर्डर आली. त्यानुसार, वाहनावर चालक म्हणून अशोक प्रसाद मेहता याची नेमणुक करून ट्रक १८ टन ७०० कि.ग्र. वजनाचे विविध आकाराचे सामान घेवून कुंभारवाडा येथील खारवा गल्लीकडे निघाला.
त्यापूर्वीच गस्तीवरील शिवडी पोलिसांच्या पथकाने हिल एव्हेन्यु रोड परिसरात सामानाची चोरी सुरु असताना आरोपीना ताब्यात घेतले. काही जण ट्रकमधून स्टिल रकवेअर बार, उतरवताना दिसून आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली. मेहता याच्याकडे चौकशी करताच, तो मो. शमशाद मो. नासीर शेख याला त्यातील काही माल विकत असल्याचे सांगितले. पुढे, शेखच्या चौकशीत, दौलत चव्हाणच्या सांगण्यावरून हा माल खाली करून करून घेतल्याचे सांगितले. याबाबत समजताच, गोडसेने तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अटकेची कारवाई केली.
या कारवाईनंतर आरोपीची जामिनावर सुटका झाली. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतरही लोखंडी साहित्यांची हेराफेरी करून साहित्य चोरी तसेच त्यातून सामान काढून फसवणूक करण्याचे प्रकार सुरु असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दौलत विरुद्ध यापूर्वी देखील कारवाई करण्यात आली आहे.आरोपी सराईत गुन्हेगारदौलत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी शिवडी पोलीस ठाण्यात २००० ते २०२२ दरम्यान १० गुन्हे नोंद आहे. तसेच अनेकांकडून दौलत विरुद्ध अनेक तक्रारीही करण्यात आल्या आहे. त्याच्या कामाला विरोध करणाऱ्याना मारहाण केल्याचाही आरोप आहे.