सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईशहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसल्याने हाती आलेली एकही संधी ते सोडत नाहीत. वाशीत बुधवारी दुपारी चक्क उपायुक्तांच्याच अंगरक्षकांनी धावपळ करून एकाला पकडले. मात्र पकडलेला तो चोर आरडाओरड करणाऱ्या महिलेचाच पती निघाल्याने हस्याची कारंजी उडाली. महिलेच्या विनंतीनंतरही त्यास सोडून न देता पोलिसांनी पुढील सोपस्कार पार पाडले.वाशी येथील एमजीएम रुग्णालयालगतच्या रस्त्याने गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे हे आपल्या गाडीमधून चालले होते. याचवेळी एक महिला चोर चोर ओरडत होती. ती ज्या दिशेला हात दाखवत होती तिथे मेंगडे यांनी आपल्या अंगरक्षकांना पाठवले. महिलेच्या गळ्यात दागिने नसल्याने नक्कीच सोनसाखळीचोराने तिला लुटले असावे, असे त्यांना काही क्षण वाटले. तीन-चार पोलिसांनी पाठलाग करून चोराला पकडून महिलेसमोर हजर केले. परंतु तो चोर आपला पतीच असल्याचे तिने सांगताच हशा पिकला. मात्र घटनेतील गांभीर्य ओळखून पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली. यावेळी आपल्याकडील पैसे घेऊन पळणाऱ्या पतीला पकडण्यासाठी आपण आरडाओरड केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. अखेर पती-पत्नीतील वादाचे हे प्रकरण त्यांनी वाशी पोलिसांकडे सोपविले. (प्रतिनिधी)
पकडलेला चोर निघाला नवरा
By admin | Published: April 09, 2015 4:54 AM