Join us

घरात पीओपीचे काम करणाराच निघाला चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दक्षिण मुंबईतील कुंभारवाडा परिसरातील इमारतीच्या दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या राहुल बेहरा यांच्या घरातील पावणे तेरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दक्षिण मुंबईतील कुंभारवाडा परिसरातील इमारतीच्या दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या राहुल बेहरा यांच्या घरातील पावणे तेरा लाख रुपयांच्या चोरीचा उलगडा करण्यास अखेर पोलिसांना यश आले. घरात पीओपीचे काम करणारा मुख्तार अलीच चोर निघाला आहे. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत अधिक तपास सुरू केला आहे.

कुंभारवाडा येथील लकडावाला सफायर इमारतीच्या दहाव्या मजल्यावर राहणारे राहुल बेहरा (३२) यांच्या घरात ही घरफोडी झाली होती. ते रेल्वे खात्यामध्ये मालाचे क्लिअरिंग एजेंट म्हणून काम करतात. १०८ वर्षीय आजीच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण कुटुंबीय २२ तारखेला गावी गेले होते.

अंत्यविधी उरकून ५ ऑगस्ट रोजी घरी परतले. तेव्हा घराचे आतील दरवाजे उघडे होते. त्यांनी बेडरूममधील सामानाकडे धाव घेतली. तेव्हा, कपाटातील सोने, चांदीचे दागिने तसेच पैसे गायब असल्याचे दिसून आले, तसेच सामानही अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.

यात बाथरूममधील खिडकीच्या काचा फुटलेल्या दिसून आल्या. येथूनच चोरट्यांनी आत प्रवेश करत ही चोरी केल्याचे समजताच पोलिसांना याबाबत माहिती दिली. यात २ लाख ८८ हजार रुपयांची रोकड आणि सोने, चांदीचे दागिने असे एकूण १२ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी व्ही.पी. रोड पोलिसांनी चोरांविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

सीसीटीव्हीमध्ये चोर मिळून आला नाही. अखेर त्यांच्या घरात काम करणाऱ्या मुख्तार अलीकडे त्यांचे लक्ष गेले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केली. अखेर चौकशी अंती त्याने गुह्याची कबुली दिली. इमारतीचे पाइप चढून बाथरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश करत ही चोरी केली. त्यानुसार व्ही. पी. रोड पोलिसांनी त्याला अटक करत ७ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. त्याने अशाप्रकारे आणखीन कुठे चोरी केली आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास सुरू आहे.