मुंबई : वृद्धेची सोनसाखळी हिसकावून फरार झालेल्या सराईत चोरांच्या मुसक्या आठ महिन्यांनंतर आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ही कारवाई कुरार पोलिसांनी केली असून चोरीला गेलेला मुद्देमालही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्च महिन्यात एका वृद्धेची सोनसाखळी हिसकावून दोघे फरार झाले होते. त्या वेळी तोंडावर हेल्मेट असल्याने त्यांची ओळख पटविणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. मात्र परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कुरार पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास करत दोघांच्या मुसक्या आवळल्या. अटक इसम हे मालाडचे राहणारे असून त्यांच्यावर कुरारसह समतानगर, ओशिवरा, दिंडोशी आणि अन्य पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून चोरीला गेलेला २ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून सध्या त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सराईत सोनसाखळी चोरांना आठ महिन्यांनंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 4:26 AM