मनोज गडनीस
मुंबई - गेल्या दोन दिवसांत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाच स्वतंत्र कारवायांमध्ये सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण २ किलो ९९ ग्रॅम सोने जप्त केले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ७२ लाख रुपये इतकी आहे.
प्राप्त माहितीनुसार, आखाती देशांतून आलेल्या काही भारतीय व परदेशी प्रवाशांकडून या सोन्याची तस्करी झाली होती. सोने तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, परदेशातून मुंबईत दाखल होणाऱ्या विमानांबाहेर अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. काही प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर त्यांची चौकशी व तपासणी केली असता त्यांच्याकडे हे सोने आढळून आले. एका प्रकरणात खजुराच्या बॉक्समध्ये सोने लपविल्याचे आढळून आले. तर उर्वरित प्रकरणात कपड्यांमध्ये तसेच बॅगेमध्ये चोर कप्पे तयार करत त्यामध्ये हे सोने लपविल्याचे आढळून आले. १४ व १५ मार्च रोजी सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी या सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. तत्पूर्वी, १० ते १२ मार्च या दोन दिवसांत आठ स्वंतत्र प्रकरणात मुंबई विमानतळावर एकूण ४ किलो २२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते. त्या सोन्याची किंमत २ कोटी ३५ लाख रुपये इतकी होती.