बचावासाठी चोरांनी स्वत:वर वार करत घर पेटविले,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 05:03 AM2017-12-10T05:03:03+5:302017-12-10T05:04:25+5:30
‘पोलीस वसाहतीत भल्या पहाटे चोर शिरल्याने खळबळ उडाली. रहिवाशांनी चोरांना घरातच कोंडून पोलिसांना फोन लावला. पोलीस दाखलही झाले. मात्र, पोलिसांना घाबरून चोराने स्वत:वरच वार केले.
मुंबई : ‘पोलीस वसाहतीत भल्या पहाटे चोर शिरल्याने खळबळ उडाली. रहिवाशांनी चोरांना घरातच कोंडून पोलिसांना फोन लावला. पोलीस दाखलही झाले. मात्र, पोलिसांना घाबरून चोराने स्वत:वरच वार केले. त्याच्या साथीदाराने चक्क घरालाच आग लावल्याचा धक्कादायक प्रकार माझगावमधील गंगा बावडी पोलीस वसाहतीत घडला. तासाभराच्या थरारमय नाट्यानंतर भायखळा पोलिसांनी संतोष गायकवाड (३२) आणि युसूफनूर इस्माईल शेख (३४) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
वेळ शनिवारी सकाळी चार वाजताची. गंगा बावडी पोलीस वसाहतीत दोन चोर घुसले. एका बंद घरात चोरी करून त्यांनी अशोक केसर यांच्या घरात दागिने चोरण्यासाठी धाव घेतली. केसर कुटुंबीय बाहेरगावी गेल्याने त्यांची चावी शेजारच्यांकडे होती. त्यांच्या घरातून आवाज येत असल्याची चाहूल लागताच शेजाºयांनी खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा घरात चोर शिरल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले. त्यांनी संधी साधून खोलीला बाहेरून कडी लावली. चोर शिरल्याची बोंब सुरूकेली. ते ऐकून संपूर्ण पोलीस वसाहतीतील रहिवाशांची झोप उडाली. भायखळा पोलिसांना घटनेची माहिती देत, रहिवाशांनी केसर यांच्या घराभोवती कडे केले. काही वेळातच भायखळा पोलीस तेथे दाखल झाले. दोघांनाही आत्मसमर्पण करण्याचे आव्हान पोलिसांनी केले.
चोरांनी बचावासाठी फिल्मी ड्रामा सुरू केला. नागरिकांच्या तावडीत सापडलो तर वाचणार नाही, या भीतीने एकाने स्वत:च्याच हातावर वार केले, तर दुसºयाने घरामध्ये आग लावली. मात्र, त्याच धुरात त्यांची कोंडी झाली. गुदमरल्यासारखे झाल्याने दोघेही बाहेर पडले. तासाभराच्या या थरार नाट्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. त्यांच्याकडील चोरीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत असून, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिंगटे यांनी दिली. दोन्ही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आल्याचेही शिंगटे यांनी सांगितले.
३ दिवसांची कोठडी
पोलीस वसाहतीत चोरी करण्याचे धाडस चोरांना चांगलेच महागात पडले. फिल्मी स्टाईलने त्यांनी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फसला. त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.