मुंबईत चोरीचा एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील कांदीवली परिसरातून पोलिसांनी दोन चोरांना अटक केली असून त्यांनी एका दुकानातून शेकडो चादरी चोरी केल्या आहेत. चोरांना मुद्देमालासकट अटक करण्यात आली. पण चोरांनी दिलेल्या माहितीतून एक वेगळीच घटना समोर आली आहे. अटक करण्यात आलेले मोहन पटवा आणि राहुल महाटो या दोघांनी कांदिवलीतील दुकानावर दारु चोरी करण्याच्या उद्देशानं दरोडा टाकला होता. पण त्यांना दुकानात दारू सापडलीच नाही आणि त्यांनी दुकानातील शेकडो चादरी लंपास केल्या. (Thieves Break Into Mumbai shop to steal alcohol but run away with blankets instead two arrested)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोन चोरट्यांना कांदिवलीतील दरोडा टाकण्यात आलेल्या दुकानात दारुचा मोठ्या प्रमाणात साठा ठेवण्यात आल्याची माहिती एकीकडून मिळाली होती. लॉकडाऊनच्या काळात अवैध पद्धतीनं दारु विक्री होत असल्यामुळे एका कपड्याचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारानं दारुचा साठा दुकानात दडवून ठेवल्याची माहिती चोरांना मिळाली होती. याचाच फायदा घेऊन चोरांनी दुकानावर दरोडा टाकला पण दुकानाचं दार फोडल्यानंतर त्यांना दारु सापडलीच नाही. मग त्यांनी चोरीसाठी आलोच आहोत मग दुकानातील शेकडो चादरी चोरण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही चादरी चोरी करुन जवळच्याच एका नाल्याच्या खाली मोकळ्या जागेत लपवून ठेवल्या होत्या. त्यातील काही चादरी अगदी कवडीमोल दरानं त्यांनी विकून देखील टाकल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्यानं दोन्ही चोरांना बेड्या ठोकल्या आणि दोघांकडून १२० चादरी हस्तगत केल्या आहेत.
"कांदिवलीतील एका दुकानातून शेकडो चादरी चोरी झाल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरांची ओळख पटली. त्यानुसार शोध घेऊन चोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि दोघांकडून १२० चादरी जप्त करण्यात आल्या आहेत", असं कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बाबासाहेब साळुंखे यांनी सांगितलं.