Join us  

आयुक्तालय हद्दीत चोरट्यांचा धुडगूस

By admin | Published: May 25, 2014 2:04 AM

शहर पोलीस आयुक्तालयात चोरट्यांनी धुडगूस घातला असून एकाच दिवशी नोंदवण्यात आलेल्या चोरीच्या ११ घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे १८ लाखांचा ऐवज लांबवला आहे.

ठाणे : शहर पोलीस आयुक्तालयात चोरट्यांनी धुडगूस घातला असून एकाच दिवशी नोंदवण्यात आलेल्या चोरीच्या ११ घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे १८ लाखांचा ऐवज लांबवला आहे. घरफोड्याच नाहीतर घराबाहेर उभ्या केलेल्या गाड्याही घेऊन त्यांनी पोबारा केल्याची माहिती पोलिसांनी दिली. राबोडीतील मझहर खान हे कुटुंबासह उत्तर प्रदेश, फैजाबाद येथे नातेवाइकांच्या लग्नासाठी आणि फिरण्यास गेले असताना त्यांचे बंद घर फोडून घरातील रोख २५ हजार आणि ८३ हजारांचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली. मुंब्रा अमृतनगरमधील शमा शेख यांच्या घरातून ४७ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि मोबाइल असा ऐवज चोरीला गेला. तसेच दिवा-दातिवली रोड येथील सुनंदा पेडणेकर या केईएम रुग्णालयात गेल्या असताना चोरट्यांनी घरातील ३७ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. बदलापूर पूर्व येथील बिना सिंगाडिया यांचे बंद घर फोडून सोन्याचे बिस्कीट आणि दागिने असा एकूण एक लाख ४० हजार १०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले़ वागळे इस्टेट, गांधीनगरमधील गणेश शिंदे यांचा एक हजारांचा मोबाइल चोरीला गेला आहे. मुंब्रा, अमृतनगर येथील इश्तियाक खान यांनी उभी केलेली २५ हजारांची मोटारसायकल चोरीला गेली आहे. पोखरण रोड, गावंड बागमधील सुजय पाटील यांची लाखोंची गाडी चोरीला गेली आहे. त्याचप्रमाणे वागळे इस्टेट येथील गणेश गुंजाळ यांची ३ लाखांची स्विफ्ट डिझायर चोरट्यांनी चोरून नेली. तसेच भांडुपमधील राजकुमार गोड रिक्षा घेऊन जेवण्यास ठाण्यात आले असताना त्यांची ५० हजारांची रिक्षा चोरीला गेली आहे. कापूरबावडी, हाइड पार्क रेसिडेन्सीमधील नंदन चौगुले यांची ३ लाख ३५ हजारांची स्विफ्ट डिझायर चोरीला गेली आहे. तसेच बदलापूर, म्हाडा कॉलनीतील नितीन हातागळे यांचा ४ लाख ५० हजारांचा बोलेरो पिकअप टेम्पो घरासमोरून चोरीला गेला आहे. (प्रतिनिधी)