चोरांची हिंमत जरा जास्तच वाढली;पोलिसासह कुटुंबीयांचे फोन घरातून लंपास
By गौरी टेंबकर | Published: November 17, 2023 06:26 PM2023-11-17T18:26:27+5:302023-11-17T18:27:16+5:30
खेरवाडी पोलिसात गुन्हा दाखल.
मुंबई: वांद्रे पूर्व परिसरात राहणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांचे मोबाईल राहत्या घरातून पळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर अधिकाऱ्याचे नाव संजय पवार (५२) असे असून ते बीकेसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यापदी कार्यरत आहेत. त्यानुसार त्यांनी अनोळखी चोराच्या विरोधात खेरवाडी पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवार हे वांद्रे पूर्वच्या शासकीय वसाहतीत गेल्या २० वर्षापासून राहतात. त्यांनी खेरवाडी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी ते बीकेसी पोलीस ठाण्यात दिवस पाळीवर होते. त्यानंतर भाऊबीज असल्याने रात्री ८ वाजता कर्तव्य संपवून घरी परतले आणि जेवण उरकून पवार, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुली झोपी रात्री १२ वाजता झोपी गेल्या. या सर्वांनी त्यांचे मोबाईल फोन हॉलमधील टेबलावर ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता उठून पवार यांनी फोन चार्जिगला लावला. त्यावेळी देखील सर्व फोन टेबलवर सुरक्षित होते. दरम्यान सकाळी सात वाजता पवार यांच्या आई रत्नाबाई या मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडल्याने दार त्यांनी नुसतेच अर्धवट लोटले. पवार यांना सकाळी १० वाजता झोपेतून जाग आली तेव्हा त्यांचा तसेच अन्य मोबाईलही सापडले नाहीत. म्हणून त्यांनी पत्नी आणि मुलींकडे चौकशी केली तसेच आजूबाजूच्या शेजाऱ्यांनाही विचारले. मात्र कोणालाही काहीच माहिती नव्हते. त्यावरून चोरी झाल्याचे पवार त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी याविरोधात खेरवाडी पोलिसात जाऊन तक्रार दिली. चोरीला गेलेल्या फोनची किंमत एकूण ५५ हजार रुपये असून त्यानुसार चोराचा शोध सुरू आहे.