मुंबई : घरातील दागिने, पैसे चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांत दाखल होतात. अशाच प्रकारे एक आजीबाई सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल करायला गेल्या आणि त्यांची तक्रार ऐकून पोलिसांच्या भुवया उंचावल्या. आजीबार्इंनी नुकतेच स्वत:साठी घेतलेले साडेआठ हजार रुपयांचे महागडे बूट चोरट्याने पळविले होते. अंधेरी पोलिसांनी आजीबार्इंची ही तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
जोगेश्वरी पूर्वेत ६८ वर्षीय सीता पीकळे राहतात. त्यांनी नुकतेच ८ हजार ५०० रुपये किमतीचे बूट खरेदी केले होते. त्यानंतर काही दिवसांनी घरात बूट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संपूर्ण घर पिंजून काढले. मात्र बूट मिळाले नाहीत. त्यांनी इमारतीचा परिसरही तपासला. मात्र कुठेच बूट न सापडल्याने अखेर त्यांनी अंधेरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यात येत असून, तसेच त्यांच्या घरातील नोकरांकडेही पोलीस बुटांबाबत चौकशी करत आहेत.
‘त्या’ अंतर्वस्त्र चोरी प्रकरणाचाही शोध सुरूयापूर्वी एका उच्चभ्रू घरातील ७८ वर्षीय वृद्धेने जपानहून खरेदी केलेले ७८ हजार रुपये किमतीचे अंतर्वस्त्र चोरीस गेले होते. तिने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती. या चोरीचादेखील पोलीस तपास करत आहेत.