Join us

अनुपम खेरच्या कार्यालयात चोरी करणारे सापडले; २ जणांना पोलिसांनी केली अटक 

By गौरी टेंबकर | Published: June 22, 2024 5:51 PM

पोलिसांनी आरोपींकडून ३४ हजार रुपये रोख, फिल्मची रील, लोखंडी तिजोरी हस्तगत केली असून पुढील तपास सुरू आहे.

मुंबई: अंबोली पोलिसांनी रफिक माजिद शेख (३५) आणि मोहम्मद दलेर बहरीम खान (३०) यांना अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांनी १९ जूनच्या रात्री अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई परिसरातील अनुपम यांच्या कार्यालयातील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू पळवून नेल्या होत्या.

परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली अंबोली पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४५४, ४५७ आणि ३८० अन्वये घरफोडी आणि चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू संशयितांना २१ जून रोजी जोगेश्वरी परिसरातून अटक करण्यात आली. ते दोघे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. पोलिसांनी सांगितले की, ते गुन्हे करण्यासाठी ऑटो रिक्षातून मुंबईच्या विविध भागात फिरतात.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रात्री अनुपम यांच्या कार्यालयात बळजबरीने प्रवेश करत सुमारे ४.१५ लाखांची रोकड , २ हजार रुपये किमतीची लोखंडी तिजोरी, तसेच १ हजार रुपये किमतीची काळी बॅग आणि अनुपम यांनी तयार केलेल्या फिल्मची रील चोरून नेली. अनुपम यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर सदर चोरीबाबत पोस्ट करत तपशील दिले होते. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे चोर  सामानासह ऑटोमध्ये बसलेले दिसत होते त्याचाही पोलिसाना तपासात फायदा झाला. पोलिसांनी आरोपींकडून ३४ हजार रुपये रोख, फिल्मची रील, लोखंडी तिजोरी हस्तगत केली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :अनुपम खेर