मुंबई : गोरेगाव परिसरातील वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांना फारच मनस्ताप सोसावा लागतो. मात्र या कारणामुळे दोन सराईत चोरांना अटक करण्यात गोरेगाव पोलिसांना सोमवारी यश मिळाले, जेव्हा एका वृद्धेची सोनसाखळी हिसकावून ते पळत होते.इरफान वझगरे (२१) आणि जफर शेख (२४) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ज्यांच्यावर मुंब्रा, ठाणे आणि पालघरमध्येदेखील अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमिलाबेन गडा (६०) या गोरेगावच्या ललित हॉटेलजवळ असलेल्या कुंकुम शॉपिंग सेंटरसमोरून चालत होत्या. त्या वेळी शेख आणि वझगरे हे दोघे मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी गडा यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. गडा यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने काही लोकांनी त्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. मात्र त्याचवेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे बीट मार्शल मनोहर लाड आणि नीलेश पाचलकर हे त्याच ठिकाणाहून जात असताना त्यांनी गडा यांना पाहिले. घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी त्या दोघा चोरांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. ते दोघे चोर वाहतूककोंडीत सापडल्याचे पोलिसांनी पाहिले. नेमके या चोरांनीदेखील पोलिसांना पाहत चुकीच्या मार्गाने गाडी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघा पोलिसांनी वेगात जाऊन या चोरांच्या मुसक्या आवळत त्यांना पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा कबूल केला.त्यांच्याकडून गडा यांची सोनसाखळीदेखील पोलिसांनी हस्तगत केली. या उत्कृष्ट कामगिरीसाठी दोन्ही बीट मार्शलचा परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी त्यांना सन्मानितदेखील केले. (प्रतिनिधी)
वाहतूककोंडीमुळे सापडले चोर
By admin | Published: May 03, 2017 6:19 AM