मुंबई : व्हॅलेटाइनच्या गुलाबी थंडीत समुद्रकिनारी प्रेमीयुगलांची गर्दी होत आहे. याच ‘गुलाबी’ संधीचा चोर फायदा घेत असल्याचा प्रकार मरिन ड्राइव्हमध्ये उघडकीस आला आहे. गप्पांमध्ये व्यस्त असलेल्या एका प्रेमी युगलाच्या शेजारून पर्स चोरी झाल्याने प्रेमी युगुलाच्या भुवया उंचावल्या. त्यांच्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी पर्स चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.माटुंगा परिसरात तक्रारदार २५ वर्षीय तरुणी कुटुंबीयांसोबत राहते. बुधवारी रात्री ९च्या सुमारास तिने मित्रासोबत मरिन ड्राइव्हचा कट्टा गाठला. दोघांमध्ये गप्पा रंगल्या. या तरुणीने तिचा मोबाइल पर्समध्ये ठेवून ती बाजूला ठेवली. दोघेही व्हॅलेंटाइनच्या गुलाबी थंडीत हरविले असताना चोरट्याने ही संधी साधून पर्स पळवली. निघण्याची वेळ झाली म्हणून तरुणीने पर्सकडे पाहिले तर ती गायब होती. दोघांनीही शोधाशोध केली. मात्र पर्स मिळाली नाही. अखेर रात्री उशिराने त्यांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.या घटनेमुळे प्रेमीयुगुलांनी किमान या गुलाबी थंडीत हरवताना आपल्या वस्तूंची काळजी घेणे गरजेचे आहे. मरिन ड्राइव्हसह वरळी सी फेस, बॅण्डस्टॅण्ड, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, नरिमन पॉइंट, शिवाजी पार्क, नारळी बाग, हँगिंग गार्डन परिसरात अशाच गर्दीत काही चोरटे प्रेमी युगुल, जोडप्यांच्या शोधात आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
चोराने साधली ‘गुलाबी’ संधी; पर्स चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 5:18 AM