उल्हासनगर : मध्य प्रदेशमधील एका वृद्धेच्या घरात जबरीने घुसून घरफोडी करणाऱ्या दोन चोरांना शहर गुन्हे अन्वेषण विभागाने एका आठवड्यातच जेरबंद केले. चोरट्यांनी चोरीची कबुली दिली असून, चोरांना मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.
मध्य प्रदेश इंदोर जिल्ह्यातील अन्नपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्धेच्या घरात ९ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता आनंद मंडल व मुकेश खूबचंदानी यांनी जबरीने घुसून कपाटातून ५० हजारांचे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी अन्नपूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चोरटे उल्हासनगरात आल्याच्या संशयावरून मध्य प्रदेश पोलिसांनी शहर गुन्हे अन्वेषण विभागाला याबाबत माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनेचा सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज व मोबाइलच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे आनंद मंडल याला डोंबिवली येथील खोनीफाटा, तर मुकेश खूबचंदानी याला शहरातील शिवाजी चौक परिसरातून जेरबंद केले. त्यांनी चोरीची कबुली दिली असून, काही प्रमाणात चोरीचे दागिने त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत.