मुंबई - सोन साखळी चोरीच्या घटनांमध्ये मुंबईत मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री विक्रोळी ते मुलुंडमधील नवघर पट्टयात अवघ्या 30 मिनिटात सोनसाखळी चोरीच्या सहा घटना घडल्या. लाल रंगाच्या पल्सर बाईकवरुन आलेल्या दोघा चोरांनी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले. या प्रकरणी नवघर पोलीस स्थानकात चार आणि विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
विक्रोळीत टागोर नगरजवळ सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या. राजश्री हुले संध्याकाळच्या वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्याचवेळी पल्सरवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळयातील 15 ग्रॅमचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. अशाच प्रकारे भारती बनसोडे (53) यांच्या 12 ग्रॅमच्या मंगळसूत्राची चोरी झाली. त्या दुकान बंद करुन घरी परतत असताना बाईकवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळयातील मंगळसूत्र खेचले व क्षणार्धात तिथून पसार झाले. जिथे ही घटना घडली तिथे रस्त्यावरचे दिवे नव्हते असे भारती यांच्या पतीने सांगितले.
संत्सगावरुन परतणा-या विजया पेडमकर (67) यांच्या गळयातील 30 ग्रॅमच्या सोन्याच्या चैनचीही अशाच प्रकारे चोरी करण्यात आली. सोन साखळी चोरांनी त्यांना धक्का दिल्यामुळे त्या खाली कोसळून जखमी झाल्या. सोनसाखळी चोरांनी लीलाबाई गायकवाड (70) यांच्या गळयातून 15 ग्रॅम आणि जया कृष्णन (78) यांच्या 80 ग्रॅमच्या सोन्याच्या चैनची चोरी केली.
वनिता वाळवे (67) या भाजी आणण्यासाठी खाली उतरल्या होत्या. त्यावेळी एका बाईक माझ्या दिशेने येताना मी पाहिली. त्या बाईकला मार्ग देण्यासाठी मी तिथेच थांबले. पण दुचाकीस्वार तिथे आला व त्याने माझ्या गळयातील मंगळसूत्र खेचून पोबारा केला असे त्यांनी सांगितले. रस्त्यावर अंधार असलेल्या भागात सोनसाखळी चोरीच्या या घटना घडल्या. सीसीटीव्ही फुटेजची क्वालिटीही खूप खराब आहे. पोलिसांनी या सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी पथके स्थापन केली आहेत.