Join us

ठाण्यात दुर्मिळ सांबाराची शिंगे विक्रीसाठी आलेला तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 20:46 IST

पोलिसांकडून तस्करीखोरांविरोधात कारवाई सुरु असताना, शुक्रवारी ठाण्यात सांबाराची शिंगे विक्रीसाठी आलेल्या मुंबईतील एका तस्काराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून २ जोडी सांबराची शिंगे हस्तगत केली

ठळक मुद्दे दोन जोडी शिंगांची किंमत ४ लाखसोमवारपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे : दुर्मीळ हरिणवर्गीय सांबराच्या कवटीसह शिंगेविक्रीसाठी आलेल्या तस्करास ठाणे पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. तसेच त्यांच्याकडून २ जोडी सांबराची शिंगे हस्तगत केली असून एका जोडीची किंमत दोन लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.उपवन तलावाजवळ एक जण हरिणवर्गीय सांबराची शिंगे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट युनिट-५ चे पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने सापळा रचून शुक्रवारी रात्री ९.३० वा.च्या सुमारास संतोष रामचंद्र बामणे (३१) याला ताब्यात घेतले. तो मुंबईतील चांदिवली फाम रोड, अंधेरी पूर्व येथे राहणारा असून त्याच्या ताब्यातून सांबराची १ जोडी शिंगे आणि घरातून आणखी एक जोडी शिंगे हस्तगत केली आहे. जप्त केलेल्या त्या दोन जोड्यांची किंमत ४ लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्याला ही शिंगे मुलुंडच्या जंगलात सापडल्याचे तो सांगत असून त्याचा आणखी काही साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर, शनिवारी न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रक रणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार करत आहेत. 

टॅग्स :ठाणेपोलिसगुन्हा