लाेकल प्रवासात पाकीटमारी, मोबाइल पळवण्याचे प्रकार सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा आहे. या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पाहूनच स्थानकात प्रवेश दिला जात आहे. मात्र लाेकल प्रवासात पाकीटमारी आणि मोबाइल चोरीच्या घटना काही कमी झालेल्या नाहीत. उलट लाॅकडाऊन लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २३ एप्रिलला रेल्वे गाड्या आणि रेल्वे परिसरातून ११ चाेरीच्या घटना घडल्या.
प्रत्येक रेल्वे स्थानकावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रांगा लावून ओळखपत्र बघूनच स्थानकात प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे या रांगेत मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. इतकेच नव्हे तर चाेरीच्या घटनाही घडत आहेत. २३ एप्रिलला मुंबई विभागात चोरीच्या ११ घटना घडल्या असून यात एकूण ९ मोबाइल चोरीच्या आहेत.
* दोन दिवसांत १५ मोबाइलची चाेरी
गेल्या दोन दिवसांत मुंबईतील लाेकल आणि रेल्वे परिसरात एकूण चोरीच्या २६ घटना घडल्या आहेत. यात मोबाइल चोरी, बॅग चोरी, पाकीट, पर्स पळवणे, मंगळसूत्र चोरीसारख्या घटनांचा समावेश आहे. या २६ चोरीच्या घटनांपैकी १५ घटना या मोबाइल चोरीच्या आहेत.
...............