- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई - बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या जबऱ्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसा दिवशी टार्गेट करत त्यांचे मोबाईल चोरी करणाऱ्या त्रिकुटाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. यात एक वेटर तर दोन बेरोजगार तरुणांचा समावेश असुन त्यांच्याकडून ९ फोनही हस्तगत करण्यात आले आहेत.
अटक आरोपींची नावे शुभम जमनाप्रसाद गढवाल (२५) आणि इम्रान महेबूब शेख भुसावळ (३०) तसेच मोहम्मद अली खाजा नूर सय्यद (२७) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे तिघे उत्तर प्रदेश तसेच माहीमचे राहणारे आहेत. शाहरुखचा वाढदिवस असल्याने १ नोव्हेंबर रोजी त्याचे फॅन्स त्याची एक झलक पाहण्यासाठी दूरदूरहून मन्नत बंगल्यासमोर गोळा झाले होते. त्याचा फायदा घेत एकूण १७ जणांचे मोबाईल चोरीला गेल्या ची तक्रार वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "तपासादरम्यान, आरोपींनी मोबाइल फोनची चोरी पूर्वनियोजित केल्याची कबुली दिली.
शाहरुख आपल्या चाहत्यांसोबत आनंद साजरा करण्यासाठी मन्नत बंगल्यात हजर झाला की त्याचा फायदा घेत मोबाईल चोरी करण्याची त्यांची योजना होती. या टोळीने मागच्या वर्षी अशाच एका घटनेची दखल घेतली होती, जिथे त्यांना मोठ्या गर्दीत चाहत्यांचे मोबाईल चोरणे तुलनेने सोपे होते. कारण मन्नत बंगल्याबाहेर ७ हजारहून अधिक लोक गोळा होतात हे त्यांना माहित होते. परिमंडळ ९ पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक विजय आचरेकर, उपनिरीक्षक गुरुप्रसाद डफळे आणि पथकाने मन्नत बंगल्याभोवती सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली. या प्रकरणातील संशयित सहा जणांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतरच्या तपासात चोरीच्या घटनेचा तपशील उघड झाला, परिणामी तीन संशयितांची सुटका झाली. इम्रान हा माहीम येथील रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करतो तर शुभम आणि मोहम्मद हा बेरोजगार आहे. चोरीमध्ये इतरांचाही सहभाग असावा असा संशय व्यक्त केला जात असून त्यांचा शोध सुरू आहे.