Join us

चोर ग्राहकाने चावी बदलून गाडी पळविली; वर्सोवा पोलिसांनी मध्य प्रदेशात केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 2:26 PM

लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या जपतप सिंग या व्यावसायिकाने त्यांची कार विक्रीसाठी ओएलएक्सवर पोस्ट केली होती.

मुंबई : अंधेरी येथे एका व्यावसायिकाने दिलेल्या ओएलएक्सवरील जाहिरातीनंतर त्याची कार खरेदी करण्याच्या निमित्ताने ती पाहण्यासाठी आलेल्या चोर ग्राहकाने गाडीच्या चावीची अदलाबदल करून दुसऱ्या दिवशी कार पळवून नेल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर वर्सोवा पोलिसांकडे कार मालकाने धाव घेतल्यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन कार परत मिळवत चोर ग्राहकालाही अटक केली.लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या जपतप सिंग या व्यावसायिकाने त्यांची कार विक्रीसाठी ओएलएक्सवर पोस्ट केली होती. २.५० लाख किमतीची गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने १४ जुलै रोजी मोहम्मद अबुजर मोहम्मद जुबेर खान (२८) सात बंगला परिसरात गाडी पाहायला आला तेव्हा सिंग यांच्या कारच्या चावीची शिताफीने अदलाबदल केली. त्यांना बनावट चावी दिली आणि मूळ चावी तो घेऊन गेला. त्यानंतर १५ जुलैला खानने खऱ्या चावीच्या मदतीने  गाडी पळवली.  सिंग  यांनी १६ जुलैला तक्रार केल्यानंतर पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांनी तपास सुरू केला.

५०-६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत- पोलिस शिपाई रकटे, किंजळकर, थोरात,अवघडे आणि तांत्रिक मदत करणारे नाईक गणेश हन्सनाळे यांनी घटनास्थळावरील ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. - त्यात आरोपी मध्यप्रदेश राज्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व टोलनाक्यांवरती दिसून आला. त्यावरून सर्व टोलनाक्यावरील फुटेजची पाहणी करून त्याची ओळख पटविण्यात आली. - वर्सोवा पोलिसांचे पथक मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये रवाना झाले आणि अखेर त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी खान याला अटक केली.  

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईकारपोलिस