Join us

मीरा-भार्इंदरमध्ये पातळ प्लास्टिक पिशव्यांचा सुळसुळाट; प्रशासन व राजकारणी ढिम्म

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 6:38 PM

मीरा-भार्इंदर महापालिका यंदाच्या गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरात ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिम गेल्या आठवड्यापासून राबवित आहे.

ठळक मुद्देमीरा-भार्इंदर महापालिका यंदाच्या गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरात ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिम गेल्या आठवड्यापासून राबवित आहे. परंतु स्वच्छतेसह पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या पातळ प्लास्टिक पिशव्यांच्या खुलेआम विक्रीकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे.

- राजू काळेभार्इंदर, दि. ३० - मीरा-भार्इंदर महापालिका यंदाच्या गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरात ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिम गेल्या आठवड्यापासून राबवित आहे. परंतु स्वच्छतेसह पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या पातळ प्लास्टिक पिशव्यांच्या खुलेआम विक्रीकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे. यामुळे बिनधास्त झालेल्या विक्रेत्यांकडून या पिशव्यांच्या वापराचा सुळसुळाट शहरभर चांगलाच वाढल्याने त्यावर त्वरीत बंदी आणावी, अशी मागणी पर्यावरणवाद्यांकडून होऊ लागली आहे.प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांमुळे शहरातील गटारे, नाले तुंबत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. तसेच या पिशव्यांमधूव टाकाऊ अन्नपदार्थ टाकले जात असल्याने ते पदार्थ पिशव्यांसह खाणाऱ्या जनावरांच्या पोटात प्लास्टिक पिशव्या जाऊन त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. प्लास्टिक पिशव्यांच्या व्यापाऱ्यांचे हित जोपासून सरकारने २० मायक्रॉन जाडीच्या पातळ पिशव्यांवर बंद घातली. सुरुवातीच्या काळात त्या पिशव्यांच्या विक्रीला लगाम घालण्यात आला. काही दिवसांतच त्या पिशव्या मागच्या दाराने आजही बाजारात खुलेआम विक्रेते बाळगत असून त्यातुनच ग्राहकांना साहित्य दिले जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्लास्टिक पिशव्यांचे विक्रेते आता मोकाट आहेत.

पालिकेकडून दरवर्षी शहरातील नालेसफाईसाठी दोन कोटींहुन अधिक निधी खर्ची घातला जातो. तरी देखील मुसळधार पावसात नाल्यांची सफाई फोल ठरुन शहर जलमय होते. पावसाळी तसेच सांडपाण्याचा निचरा प्लास्टिकच्या पिशव्यांत अडकला जात असल्याने त्यांचा अडसर नाले तुंबण्यास कारणीभूत ठरतो. तुंबणारे पाणी नाल्याबाहेरपडुन आसपासच्या घरांत शिरुन साहित्यांचे नुकसान होते.  शहरातील पावसाळी व सांडपाणी लगतच्या भार्इंदर खाडीत सोडले जाते. गटारे व नाल्यांत टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या खाडीत जाऊन त्या पाण्यातील प्रदुषण वाढवितात. सहा वर्षांपुर्वी प्रशासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीला बंदी घातली होती. हि बंदी काही दिवसांपुर्वीच मर्यादित राहिल्याने आजमितीस शहरात पातळ पिशव्यांच्या विक्रीचा सुळसुळाट झाला आहे. प्लास्टिक पिशव्या वाहुन नेण्यासाठी हलक्या व सोईस्कर ठरत असल्या तरी त्याचा होणारा परिणाम मात्र वाईट असल्याचे पर्यावरणवाद्यांकडुन सांगितले जाते. या पिशव्या पॉलीप्रॉपीलीन या पेट्रोलियम व नैसर्गिक वायूपासुन तयार केल्या जात असल्याने त्या अविघटीत असतात. तसेच त्याचा पुर्नवापर करता येत नाही. त्यामुळे त्या मनुष्यासह, प्राण्यांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरतात. अशा प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर त्वरीत बंदी घालुन शहर प्लास्टिक पिशवीमुक्त करावे, अशी मागणी पर्यावरणवाद्यांकडुन होऊ लागली आहे. 

याबाबत पर्यावरणप्रेमी अ‍ॅड. किशोर सामंत यांनी सांगितले कि, प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे दरवर्षी १ लाख प्राण्यांचा मृत्यु होतो. जगात ५०० कोटींहुन अधिक प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात असल्याने त्याचा विपरित परिणाम पर्यावरणावर होत आहे. अशा अविघटीत पदार्थाच्या वापरावर प्रशासनाने यंदाच्या गांधी जयंतीचे औचित्य साधुन बंदी घातली पाहिजे. तसेच पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले कि, पातळ प्लास्टिक पिशव्यांऐवजी सरसकट प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दरम्यान प्लास्टिक पिशवी बंदीचा ठराव महासभेत मंजुर झाल्यास प्रशासनाच्या कारवाईला बळ मिळेल.