शिवसेनेच्या भवितव्याचा विचार करा अन् भाजपशी युती करा; आठवलेंची उद्धव ठाकरेंना साद, फॉर्म्युलाही सांगितला!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 06:57 PM2021-06-20T18:57:10+5:302021-06-20T18:58:04+5:30
शिवसेना आमदार प्रतास सरनाईक यांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर आता रिपब्लिक पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे.
शिवसेना आमदार प्रतास सरनाईक यांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर आता रिपब्लिक पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शिवसेना-भाजपच्या युतीच्या चर्चा झडू लागल्या आहेत. त्यात रामदास आठवले यांनीही उद्धव ठाकरे यांना युतीसाठी साद घातली आहे.
उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल; सरनाईकांच्या लेटरबॉम्बनं खळबळ
"शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलेल्या मताला माझा पाठिंबा आहे. मी याआधीही सांगत आलो आहे. शिवसेनेच्या भवितव्याचा, महाराष्ट्राच्या हिताचा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांचा विचार करुन उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती करावी", असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.
रामदास आठवले यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी जुळवून घेताना मुख्यमंत्र्यांना कठीण जात असल्याचंही म्हटलं आहे.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 20, 2021
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाजूला सारून शिवसेनेने भाजपशी युती करावी ही आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे एकमेकांशी आजही आपुलकीचे नाते आहे. त्यामुळे पुन्हा भाजपशी युती करण्यास शिवसेनेला अडचण होणार नाही, अशी सरनाईक यांची सूचना योग्य आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जोडीच्या चक्रात उद्धव ठाकरे अडकले आहे. त्यामुळे त्यांना काम करणंही अवघड होत आहे, असंही आठवले म्हणाले.
आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना भाजप ने युती करावी अशी मांडलेली भूमिका स्वागतार्ह आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप शी युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घ्यावा.@OfficeofUT
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 20, 2021
अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हाच सत्तेचा फॉर्म्युला
भाजपशी युती करण्यासाठीचा फॉर्म्युला देखील यावेळी रामदास आठवले यांनी सांगितला आहे. "शिवसेनेनं पुन्हा भाजपसोबत युती करुन राज्यात अडीच वर्षांसाठीचं मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं. अडीच वर्ष देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद द्यावं, तर अडीच वर्ष शिवसेनेनं मुख्यमंत्रीपद घ्यावं. यातच महाराष्ट्राचं आणि दोन्ही पक्षांचंही भलं आहे", असं रामदास आठवले म्हणाले.