मुंबई : नाणार प्रकल्प हा केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो महाराष्ट्रातून बाहेर जाता कामा नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादात उडी घेतली आहे. तसेच १० मे रोजी नाणारला भेट देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.पवार म्हणाले की, महाराष्ट्राबाहेर प्रकल्प जाऊ नये, म्हणून सरकारने पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो का, हे पाहणे गरजेचे आहे. स्थानिकांचा विरोध पाहता प्रकल्पाची जागा बदलता येते का? याचा विचार करायला हवा. प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतरच मत व्यक्त करेन, असे म्हणत पवार यांनी त्यांची भूमिका राखून ठेवली आहे. यासंदर्भात सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी झालेला सामंजस्य करार वेस्ट कोस्ट रिफायनरींबाबत असून नाणार प्रकल्पाशी त्याचा संबंध नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. स्थानिकांना विश्वासात घेऊनच पुढचा निर्णय घेऊ, असे म्हणत त्यांनी सारवासारव केली आहे.>यापुढे तीव्र आंदोलन!सौदी अरेबिया कंपनीसोबत झालेल्या करारानंतर कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत शांततेने होणारे आंदोलन यापुढे तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिला आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आणि राजापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चे काढण्याची घोषणा त्यांनी केली.
‘नाणार’साठी पर्यायी जागेचा विचार करा - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 5:09 AM