मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला अनेकदा सामाजिक प्रश्नांवर तिचे परखड मत मांडते. तिची पर्यावरणाविषयीची काळजी नवीन नाही. नुकतीच 'हुश हुश' या वेब सीरिजमध्ये दिसलेली जुही चावलाने आता मुंबईच्या हवेतील दुर्गंधी आणि प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. पण तिने मुंबईबाबत जो शब्दप्रयोग वापरला त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतापून सेलिब्रिटींना सल्ला दिला आहे.
जुहीने तिच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, 'मुंबईतील हवेत दुर्गंधी येते हे कोणाच्या लक्षात आले आहे का? पूर्वी हा वास खाड्यांजवळ (वरळी आणि वांद्रे, मिठी नदीजवळील गलिच्छ पाण्याचा परिसर) कार चालवताना यायचा. मात्र आता ही दुर्गंधी संपूर्ण दक्षिण मुंबईत पसरली आहे. इथे एक विचित्र रासायनिक प्रदूषण आहे.' जुहीने तिच्या पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'आपण रात्रंदिवस गटारात राहत आहोत असे दिसते.' मुंबईच्या हवेतील प्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की, श्वास घेताना गटाराचा वास येतो असं तिने म्हटलं.
जुही चावलाच्या या विषयावर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, 'मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. शहरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे, हे खरे आहे. महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे नागरिकांना काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पण आता सरकार बदललं आहे. आता मुंबई बदलणार आहे. त्यामुळे मुंबईबद्दल अशा प्रकारे बोलणे चुकीचे आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, त्यामुळे सेलिब्रिटींनी अशी विधाने करण्यापूर्वी दोनदा विचार करायला हवा असा सल्ला त्यांनी सेलिब्रिटींना दिला.
5G मुद्द्यावरून जुहीला न्यायालयानं फटकारलंयापूर्वी 5G च्या मुद्द्यावरून न्यायालयीन लढाईमुळे जुही चावला खूप चर्चेत होती. देशातील 5जी नेटवर्कविरोधात अभिनेत्रीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. ५ जीमुळे पर्यावरणाची हानी होऊन लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, असा युक्तिवाद तिने केला होता. मात्र, न्यायालयाने जुही चावलाची याचिका केवळ फेटाळून लावली नाही, तर कोणतंही संशोधन न करता असा दावा केल्याबद्दल तिला फटकारले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"