Join us  

चीनमधील विद्यापीठात प्रवेश घेताना विचार करा; निर्बंध कायम असल्याने यूजीसीचे विद्यार्थ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 8:16 AM

चीनने २०२० पासून भारतीयांना व्हिसा देणे बंद केले, शिवाय चीन पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.

मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षासाठी अनेक चिनी विद्यापीठे आणि महाविद्यालयांकडून विविध पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे यूजीसी आणि एआयसीटीईच्या (विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रज्ञान संशोधन परिषद) निदर्शनास आले आहे. चीनने २०२० पासून भारतीयांना व्हिसा देणे बंद केले, शिवाय चीन पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणासाठी चीनमधील विद्यापीठातून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व नोकरीतील अडचणी यांचा विचार करून प्रवेश घेण्याचा सल्ला यूजीसी आणि एआयसीटीईने दिला आहे.एका सर्वेक्षणानुसार, चीनमध्ये जवळपास २३ हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चीनमधील कोरोनाची परिस्थिती अद्यापही पूर्ववत न झाल्याने तसेच व्हिसा आणि थेट प्रवास अशा निर्बंधामुळे तेथील विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्याप परवानगी मिळत नसल्याची माहिती आहे. या कारणास्तव तेथे शिकणारे विद्यार्थी आपले शिक्षण प्रत्यक्षपणे पूर्ण करण्यासाठी तेथे परतू शकत नाहीत. यामुळे तेथील अनेक विद्यापीठ प्राधिकरणांनी आपला अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवला आहे. भारतात ऑनलाइन पदवीला मान्यता नाही !चीनमधील विद्यापीठांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवला आहे. तरी भारतीय अभ्यासक्रमांच्या नियमाप्रमाणे पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केलेल्या पदवीला कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय मान्यता नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षणावर प्रश्नचिन्ह कायमयापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी चीनमधील विद्यापीठात विविध अभ्यासक्रमासाठी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. अद्यापही चीनमधील निर्बंध कधी संपतील, याची कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदव्या व प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे काम ऑनलाईन स्वरूपातच झाल्यास ते भारतात अवैध ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.