Join us

Uddhav Thackeray: दिवस फिरले तर तुमचं काय होईल विचार करा; उद्धव ठाकरेंचं थेट जेपी नड्डांना आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 3:15 PM

मुंबई-भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बिहारमधील भाषणातून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्यांना ज्यापद्धतीनं त्यांचा पक्ष वाढवायचा आहे यातून ...

मुंबई-

भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बिहारमधील भाषणातून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्यांना ज्यापद्धतीनं त्यांचा पक्ष वाढवायचा आहे यातून यांना फक्त बळाचा वापर करायचा आहे असं दिसून येत आहे. देशात अतिशय घृणास्पद राजकारण भाजपाकडून सुरू आहे. याकडे जनतेनं आता डोळे उघडून बघण्याची वेळ आली आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काल बिहारच्या पाटणामध्ये केलेल्या भाषणातील मुद्दे मांडून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. "देशात आता प्रादेशिक पक्ष शिल्लक राहिलेले नाहीत असं जेपी नड्डा बोलले यातूनच त्यांना देशात काय करायचं आहे हे लक्षात येतं. देशात भाजपा हा एकमेव पक्ष राहणार आहे असं ते म्हणाले हे विधान अत्यंत गंभीर आहे. त्यांच्या विधानात लोकशाही कुठे आहे का? राजकारण एक बुद्धीबळ असल्याचं आपण म्हणतो. पण यांच्याकडून फक्त बळाचा वापर केला जात आहे. बुद्धीचा वापर आता केला जात नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दिवस फिरले तर तुमचं काय होईल याचा विचार जेपी नड्डा यांनी करावा", असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. 

भाजपाचा वंश कुठून सुरू झाला?जेपी नड्डा यांनी देशातील सर्व पक्षात वंशवाद सुरू असल्याचं म्हटलं. पण त्यासोबतच विविध पक्षात बरीच वर्ष काम केलेले लोक आज भाजपामध्ये येत आहेत असंही ते म्हणाले. मग भाजपाचा वंश नेमका कुठून सुरू झाला? हे त्यांनी ठरवावं. भाजपाकडून सुरू असलेलं राजकारण घृणास्पद स्वरुपाचं आहे. बळाचा वापर करुन प्रादेशिक पक्षातील नेत्यांना फोडायचं आणि गुलामासारखं वागवायचं. सगळे पक्ष संपतील किंवा आम्ही संपवू असा जेपी नड्डा यांच्या भाषणाचा कंसातील अर्थ आहे. त्यामुळे लोकांनी आता वेळ जाण्याच्या आधी विचार करण्याची वेळ आली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

संजय राऊतांचा मला अभिमान"संजय राऊत माझे मित्र आहेत आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांचा मला अभिमान आहे. त्यांचा गुन्हा काय होता? झुकेगा नहीं हे सिनेमात बोलणं खूप सोपं असतं पण संजय राऊतांनी ते सिद्ध करुन दाखवलं आहे. हुकूमशाहीसमोर न झुकता लढू शकतो ही एक ठिणगी संजय राऊतांनी टाकली आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेसंजय राऊतजगत प्रकाश नड्डाभाजपा