Join us

चिंतनची हवी नार्को टेस्ट

By admin | Published: January 02, 2016 8:34 AM

हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भांबानी यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेला हेमाचा पती चिंतन याच्या नार्को टेस्टसाठी पोलिसांनी न्यायालयात परवानगी मागितली आहे.

- डिप्पी वांकाणी,  मुंबईहेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भांबानी यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेला हेमाचा पती चिंतन याच्या नार्को टेस्टसाठी पोलिसांनी न्यायालयात परवानगी मागितली आहे. न्यायालयात तसा अर्ज पोलिसांनी दिला आहे. याबाबतची सुनावणी आता पुढील सोमवारी होणार आहे. चिंतनच्या दिल्लीस्थित घरातून महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत. तथापि, खून प्रकरणात वापरलेले रासायनिक पदार्थ चिंतनला कोणी पुरविले याची माहिती घ्यायची असून त्यासाठी ही तपासणी आवश्यक असल्याचे चौकशी पथकाने म्हटले आहे. दरम्यान, चिंतनच्या वकिलांनी केलेल्या थर्ड डिग्रीच्या आरोपानेच आता यू टर्न घेतला आहे. कारण न्यायालयाने जेंव्हा चिंतनला विचारले की, पोलिसांबद्दल तुला काही तक्रार आहे का? तेव्हा चिंतनने सांगितले की, आपणाला पाठीच्या दुखण्याचा त्रास असून पोलिसांनी आपल्याला कोठडीत झोपण्यासाठी जी लाकडी फळ्यांची जागा दिली आहे त्याचा आपणास त्रास होत आहे. पोलिसांनी या दुहेरी खून प्रकरणात चिंतनसह पाच जणांना अटक केली आहे. चिंतनची कोठडी शुक्रवारी संपत असल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, चिंतनच्या दिल्ली येथील निवासस्थानातून काही स्केचेस, डायरी, आय पॅड, हार्ड डिस्क आणि मेमरी कार्ड जप्त करण्यात आले असून, त्याचा या हत्याकांडाशी संंबंध असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. तथापि, सापडलेल्या डायरीच्या आधारे चिंतनला काही माहिती विचारायची आहे. तर या प्रकरणातील एक फरार आरोपी विद्याधर राजभर याच्या तपासासाठी परराज्यात पथक पाठविण्यात आले असून त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले. हे खून करण्यासाठी जे रासायनिक पदार्थ वापरले ते नेमके कोणी पुरविले? याची माहिती घ्यायची असून त्यासाठी पोलिसांनी कोठडी वाढवून मागितली. पोलिसांनी नार्को टेस्टसाठी अर्ज करण्यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला असता सूत्रांनी सांगितले की, चिंतन पोलिसांपासून अनेक गोष्टी लपवून ठेवत आहे. सरळ उत्तरे देत नाही. अन्य आरोपींसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? तसेच हेमासोबत काय मतभेद झाले? तसेच विद्याधरसंबंधीच्या प्रश्नांवर चिंतन भाष्य करत नाही. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला हवी आहेत, त्यामुळे नार्को टेस्टसाठी आम्ही अर्ज केल्याचे सूत्रांनी सांगितले. चिंतनला विचारले, काही तक्रार..? पोलिसांबाबत काही तक्रार आहे का, असा सवाल न्यायालयाने चिंतनला केला तेव्हा चिंंतनने याचे नकारात्मक उत्तर दिले. पण, चिंतनचे वकील नितीन प्रधान यांनी सांगितले की, चिंतनला पाठदुखीचा त्रास आहे आणि पोलिसांकडून त्याला कोठडीत झोपण्यासाठी लाकडांच्या फळ्या पुरविण्यात आल्या आहेत. त्याचा त्रास होत आहे. चिंतनची आॅर्थोपेडिक चाचणी करण्याच्या मागणीचाही त्याच्या वकिलांनी पुनरुच्चार केला.