संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात भांडुपमधून तिसरी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 08:23 AM2023-03-08T08:23:41+5:302023-03-08T08:24:03+5:30
शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉक दरम्यान देशपांडे यांच्यावर बॅट आणि स्टम्पने हल्ला करण्यात आला होता.
मुंबई : खंडणी विरोधी पथकाने मनसेचे सरचिटणीस, प्रवक्ते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात भांडुपमधून तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. विकास चावरिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉक दरम्यान देशपांडे यांच्यावर बॅट आणि स्टम्पने हल्ला करण्यात आला होता. गुन्हेशाखेने शिवाजी पार्कसह मुंबईतील सुमारे २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत अन्य तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपी हे भांडूपमधील रहिवासी असल्याची माहिती मिळविली. त्यानंतर गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल सेनेचा उपाध्यक्ष अशोक खरात (वय ५६) आणि त्याचा सहकारी किशन सोलंकीला (३५) ताब्यात घेत अटक केली आहे.
प्रसिद्धीसाठी केला हल्ला
आपले नाव मोठे व्हावे, नाव सर्वांना समजावे या हेतूने हा हल्ला केल्याचे अशोक खरात याने चौकशीत सांगितल्याचे गुन्हेशाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, नव्वदीच्या दशकापासून गुन्हेगारी जगतात सक्रिय असलेल्या अशोक याने दिलेला जबाब न पटणारा असल्याने या गुन्ह्याचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे.