Join us

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी नऊ हजारांच्या घरात दैनंदिन रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी नऊ हजारांच्या घरात दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. शहर उपनगरात रविवारी नऊ हजार ...

मुंबई : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी नऊ हजारांच्या घरात दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. शहर उपनगरात रविवारी नऊ हजार ९८९ रुग्ण आणि ५८ मृत्यू झाले. आता मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या पाच लाख २० हजार २१४ झाली असून, बळींचा आकडा बारा हजार १७वर गेला आहे. सध्या ९२ हजार ४६४ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत दिवसभरता आठ हजार ५५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत चार लाख १४ हजार ६४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७९ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५ दिवसांवर आला आहे. ४ ते १० एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.९३ टक्के आहे. दिवसभरात ५२ हजार १५९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण ४६ लाख १० हजार ७८९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींत सक्रिय कंटेन्मेंट झोन्स ८१ आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारती ८७० आहेत.

चौकट

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत एकूण दोन हजार ४१० आयसीयू खाटा आहेत. त्यातील केवळ ८७ खाटा रिक्त आहेत, तर नऊ हजार ७६२ ऑक्सिजन खाटा असून, त्यातील आठ हजार ४८१ बेड्स भरलेले आहेत. त्याशिवाय, साधे एक हजार २८१ बेड्स रिक्त असल्याचे सांगण्यात आले. व्हेंटिलेटरवर खाटांची क्षमता एक हजार २७३ असून, त्यापैकी एक हजार २४३ खाटा भरलेल्या आहेत आणि केवळ ३० खाटा रिक्त आहेत.

आठवड्याभरात २४१ मृत्यू

मुंबईत मागील काही दिवसांत दैनंदिन रुग्णनिदानासोबतच मृत्यूंची संख्याही हळूहळू वाढताना दिसत आहे. मुंबईत ५ एप्रिल रोजी दिवसभरात २१ रुग्णांचा मृत्यू झाला होता, आठवड्याच्या अखेरीस रविवारी ११ एप्रिल रोजी २४ तासांत मुंबईत ५८ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे, तर ५ ते ११ एप्रिलदरम्यान मुंबईत एकूण २४१ कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे.