‘पेंग्विन दर्शनाची तिसरी डेडलाइन उलटली

By admin | Published: January 26, 2017 03:42 AM2017-01-26T03:42:43+5:302017-01-26T03:42:43+5:30

भायखळा येथील राणी बागेतील पेंग्विन दर्शनचे उद्घाटन लवकरात लवकर करून विरोधकांचे तोंड बंद करण्याची शिवसेनेची संधी हुकणार

'The third deadline of Penguin Darshan has come down | ‘पेंग्विन दर्शनाची तिसरी डेडलाइन उलटली

‘पेंग्विन दर्शनाची तिसरी डेडलाइन उलटली

Next

मुंबई : भायखळा येथील राणी बागेतील पेंग्विन दर्शनचे उद्घाटन लवकरात लवकर करून विरोधकांचे तोंड बंद करण्याची शिवसेनेची संधी हुकणार आहे. आचारसंहितेला बगल देत, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचा शिवसेनेचा बेत होता. मात्र, पेंग्विनसाठी तयार होणाऱ्या काचघराचे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे २५ जानेवारीची डेडलाइनही चुकली असून, शिवसेनेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा बार निवडणुकीपूर्वी उडवण्याची शक्यता आता धूसर आहे.
दक्षिण कोरियावरून आणलेल्या हेम्बोल्ट जातीच्या आठ पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतर, शिवसेनेसमोरील अडचणी वाढल्या. पेंग्विनच्या मृत्यूची चौकशी, लोकायुक्तांकडे सुनावणी, केंद्रीय प्राणिसंग्रहालयातून परवाना रद्द करण्याची राणी बागेला आलेली नोटीस, अशा घडामोडींमुळे हा प्रकल्पच धोक्यात आला आहे. त्यात पेंग्विनची देखभाल व राणीबागेत तशी सेवा निर्माण करण्यासाठी नेमलेली कंपनीच बोगस असल्याचे उजेडात आल्याने खळबळ उडाली.
पेंग्विन आणण्याचा निर्णय बालहट्ट असल्याचा आरोप पुसण्यासाठी शिवसेनेला महापालिका निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाचे उद्घाटन करायचे होते. मात्र, एकीकडे विरोधकांकडून कोंडी सुरू असताना, राणी बागेत काचघर तयार
करण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली.
त्यामुळे ७ डिसेंबरची डेडलाइन ३० डिसेंबरवर व नंतर २५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. तरीही काचघर तयार करण्याचे काम सुरूच आहे. पेंग्विनसाठी काचघरात अन्य सुविधा तयार करण्याचे काम सुरू
असल्याने, पेंग्विन दर्शन आता फेब्रुवारीमध्येच असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'The third deadline of Penguin Darshan has come down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.